ग्रामविकासची धुरा पहिल्यांदाच बीडकडे !
By Admin | Updated: November 3, 2014 00:40 IST2014-11-03T00:18:05+5:302014-11-03T00:40:33+5:30
संजय तिपाले ,बीड राज्याच्या राजकारणावर कायम दबदबा राखणाऱ्या बीडच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली; परंतु ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद एकदाही मिळाले नव्हते.

ग्रामविकासची धुरा पहिल्यांदाच बीडकडे !
संजय तिपाले ,बीड
राज्याच्या राजकारणावर कायम दबदबा राखणाऱ्या बीडच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली; परंतु ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद एकदाही मिळाले नव्हते. रविवारी पंकजा मुंडे यांच्यामुळे हे खाते बीडकडे आले. राज्यमंत्रीपदाचा प्रवास न करता थेट कॅबिनेट मंत्री होण्याची संधी यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांना मिळाली होती. योगायोग असा की, मुंडेंनतर त्यांच्या कन्या पंकजा यांनीच हा मान मिळविला आहे.
सुंदरराव सोळंके हे जिल्ह्यातील पहिले कॅबिनेट मंत्री. १९७५ ते १९७७ या दरम्यान त्यांनी उद्योग व सार्वजनिक खात्याची जबाबदारी पेलली होती. नंतर ते उपमुख्यमंत्रीही झाले होते. त्यानंतर हा मान मिळाला गोपीनाथ मुंडे यांना. १९९५ ते ९९ या कालावधीत ते युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. २००३ ते २००९ या दरम्यान विमल मुंदडा यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान मिळविले. २००३ ते २००४ मध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. पुढे २००९ ते २०१४ मध्येही त्यांना हा मान मिळाला. आता पंकजा मुंडे यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत कॅबिनेट मंत्री म्हणून जिल्ह्यातील चार नेत्यांनी मोहोर उमटवली होती. पंकजांमुळे जिल्ह्याकडे पाचव्यांदा कॅबिनेट मंत्रीपद आले आहे. सुंदरराव सोळंके, विमल मुंदडा, जयदत्त क्षीरसागर या मातब्बरांना आमदार, राज्यमंत्री असा प्रवास पूर्ण करुन कॅबिनेट मिळाले होते. गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे हे पिता आणि लेक याला अपवाद आहेत. त्या दोघांनीही आमदार ते थेट कॅबिनेट असा पल्ला गाठला.
ग्रामविकासाचे स्वप्न होणार साकार!
गोपीनाथराव मुंडे यांची नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात ग्रामविकासमंत्री म्हणून वर्णी लागली होती. मात्र, मुंडे यांचे निधन झाल्याने त्यांनी पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांच्या कन्या पंकजा यांच्याकडे ग्रामविकास हेच खाते आले आहे. त्यामुळे पित्याचे स्वप्न साकार करण्याची संधी पंकजा यांना मिळाली आहे.