ग्रामीण भागात आढळले २० टक्के दूषित पाणी
By Admin | Updated: August 12, 2014 01:57 IST2014-08-12T00:51:59+5:302014-08-12T01:57:05+5:30
जालना : जिल्ह्यात ग्रामीण भागात २० टक्के पिण्याचे पाणी दूषित असल्याची कबूली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असून याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना

ग्रामीण भागात आढळले २० टक्के दूषित पाणी
जालना : जिल्ह्यात ग्रामीण भागात २० टक्के पिण्याचे पाणी दूषित असल्याची कबूली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असून याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना दूषित पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष काळजी घेण्याची सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ग्रामीण भागात साथीचे आजार नसल्याचा दावाही जि.प. आरोग्य विभागाकडून सोमवारी करण्यात आला.
‘लोकमत’ ने ग्रामीण भागातील दूषित पाणीपुरवठ्यासंबंधीचे सर्वेक्षण शनिवारी केले होते. या सर्वेक्षणाचे वृत्त रविवारच्या अंकातून प्रसिध्द झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. त्यानंतर ग्रामपंचायतींना ही सूचना करण्यात आली.
ग्रामीण भागात पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे जि.प.चे कर्मचारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसल्याने गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या योजनेमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर होतो की नाही याकडे कोणाचेही लक्ष नाही. अनेक जलवाहिनी फुटलेल्या आहेत. त्यामुळे नालीचे पाणी त्याद्वारे नळाना येते.
अनेक ठिकाणी जलवाहिनी देखील कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे जलवाहिनीला सतत गळती लागते. जलशुद्धीकरण यंत्र बंद असल्याचे प्रकारही काही ठिकाणी आढळून आले. काही ठिकाणी वेळेवर वीजपुरवठा होत नसल्याने गावात नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे कुपनलिकांमधील पाणी ग्रामस्थांना घ्यावे लागते. अशा कुपनलिकांभोवती घाणीचे साम्राज्य, गटारेही असतात. त्यामुळे हे पाणीही दूषित असते. जिल्ह्यात गोदाकाठावर सुमारे ४० गावांमध्ये तर बारा महिने दूषित पाणी असते. मात्र याकडेही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.पी. भटकर यांना विचारणा केली असता ग्रामीण भागात २० टक्के दूषित पाणी असल्याचे त्यांनी सांगितले. गावात सार्वजनिक पाणीपुरवठा करताना पाण्याचे शुद्धीकरण करावे, त्यासाठी आवश्यक ब्लिचिंग साठा अगोदरच उपलब्ध ठेवावा, कुठे गटार, घाणीचे साम्राज्य असल्यास तेथे साफसफाई करावी, अशी सूचना आरोग्य विभागासह संबंधित ग्रामपंचायतींना करण्यात आल्याचे डॉ. भटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)