रुपीचे खातेदार लढा उभारणार

By Admin | Updated: November 5, 2014 00:59 IST2014-11-05T00:46:37+5:302014-11-05T00:59:43+5:30

औरंगाबाद : खातेदारांचे पैसे अडकून ठेवण्यापेक्षा धनाढ्य कर्जदारांच्या मालमत्ता लिलावात काढा. कर्जदारांना पाठीशी घालण्यापेक्षा खातेदारांचे पैसे द्या, असा संताप आज रुपी बँकेच्या खातेदारांनी व्यक्त केला

Rupee account holder will set up the fight | रुपीचे खातेदार लढा उभारणार

रुपीचे खातेदार लढा उभारणार


औरंगाबाद : खातेदारांचे पैसे अडकून ठेवण्यापेक्षा धनाढ्य कर्जदारांच्या मालमत्ता लिलावात काढा. कर्जदारांना पाठीशी घालण्यापेक्षा खातेदारांचे पैसे द्या, असा संताप आज रुपी बँकेच्या खातेदारांनी व्यक्त केला. या पुढे या बँकेच्या राज्यभरातील खातेदार, ठेवीदारांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन न्यायालयीन व सरकारी पातळीवरील लढा संयुक्तरीत्या उभारण्याचा निर्णय शहरातील बैठकीत घेण्यात आला.
रिझर्व्ह बँकेने २१ फेब्रुवारी २०१३ रोजी रुपी बँकेवर प्रशासक नेमला आहे व बँकेचा परवाना निलंबित केला आहे. तेव्हापासून बँकेत लाखो रुपये असूनही खातेदारांना ते काढणे कठीण झाले आहे. यासंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शहरातील या बँकेच्या खातेदारांची मंगळवारी सकाळी बैठक झाली. औरंगाबादेतील शाखेत साडेसहा हजार खातेदार असून त्यांच्या खात्यात सुमारे १६ कोटी ५० लाख रुपये अडकून पडले आहेत. खातेदारांना व्याजासह पैसे परत मिळावे यासाठी येथील खातेदार व ठेकेदारांनी एकत्र येऊन जुलै २०१४ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच ग्राहक मंचमध्ये बँकेच्या विरोधात २ दावे दाखल केले. याशिवाय १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्र्यांपासून सर्वांना ई-मेलही पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. प्रकाश नाईक यांनी दिली.
पुणे येथे नुकतेच तेथील पुणेकर नागरिक कृती समिती, रुपी बँक कर्मचारी संघटनेने बँकेच्या संचालकांविरोधात आंदोलन उभे केले आहे. यापुढे आता राज्यात बँकेच्या जेथे जेथे शाखा होत्या तेथील खातेदार व ठेवीदारांच्या संघटनांना एकत्र करून एकत्रित लढा देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला, तसेच संघटनेची पुढील बैठक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता खडकेश्वर परिसरातील एकनाथ संशोधन मंदिरात होणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
यावेळी अरविंद देशपांडे, श्रीकृष्ण कोल्हारकर, राजेश मेहता, स्मिता देशपांडे, माया जोशी, गीता निधोनकर, कृष्णा कुलकर्णी, डॉ. श्यामराव पिसोळकर, प्रकाश तापी आदी खातेदार हजर होते.
५८ वर्षीय शशिकला सोरमारे या महिलेने सांगितले की, रुपी बँकेत खाते उघडले होते त्यात मुलीच्या लग्नासाठी साडेतीन लाख रुपये ठेवले होते. मात्र, बँक अचानक बंद झाली आणि मागील दीड- दोन वर्षांपासून आमची पैसे बँकेत अडकून पडले. या दरम्यान मुलीचे लग्न ठरले बँकेत रक्कम असूनही उपयोगात आली नाही. अखेर नातेवाईक, ओळखींच्या व्यक्तींकडून आम्ही पैसे उसने घेऊन ३० मे २०१४ रोजी लग्न लावले.
माझे पती विठोबा सोरमारे हे पोस्ट खात्यात असून तेही ४ महिन्यांनंतर निवृत्त होणार आहेत. मुलीच्या लग्नासाठी उसनी रक्कम घेतली ती फेडण्यासाठी आता तरी माझी रक्कम बँकेने परत द्यावी, नसता बँकेसमोर उपोषणाला बसेल, असा संतप्त इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Rupee account holder will set up the fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.