सणासुदीच्या काळात पाण्यासाठी धावपळ

By Admin | Updated: October 13, 2014 00:34 IST2014-10-13T00:32:58+5:302014-10-13T00:34:45+5:30

औरंगाबाद : ढोरकीन पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा १२ दिवसांमध्ये तीन वेळा खंडित झाला. १२

Runway for water during festive season | सणासुदीच्या काळात पाण्यासाठी धावपळ

सणासुदीच्या काळात पाण्यासाठी धावपळ

औरंगाबाद : ढोरकीन पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा १२ दिवसांमध्ये तीन वेळा खंडित झाला. १२ तास वीजपुरवठा नसल्यामुळे ५६ एमएलडीची जलवाहिनीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह बंद होता. त्यामुळे नागरिकांना दिवाळीच्या तोंडावरच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली.
११ आॅक्टोबर रोजी दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रविवारी अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सुटी असतानाही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली, तर खाजगी टँकर्सवाल्यांची चांदी झाली.
औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने १ सप्टेंबरपासून शहराचा पाणीपुरवठा ताब्यात घेतला आहे. १५ ते २३ सप्टेंबरपर्यंत जलवाहिन्यांच्या डागडुजीसाठी शटडाऊन घेतले. त्यानंतर आता विजेच्या लपंडावामुळे निर्जळीचा योग शहरवासीयांना आला आहे.
शहरात पाण्याची बोंब
सिडको- हडकोसह शहरात पाण्याची बोंब झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सिडकोतील अनेक वॉर्डांमध्ये पाण्याची अडचण होती. तशीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीच्या काळात निर्माण झाली आहे.
आचारसंहिता असल्यामुळे अधिकारी निवडणुकीच्या ड्यूटीवर आहेत, तर सत्ताधारी शिवसेना- भाजपाचे पदाधिकारी प्रचारात दंग आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे १ आॅक्टोबरपासून आजपर्यंत तीन वेळा वीजपुरवठा खंडित झाला.
परिणामी, सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागले. महावितरण कंपनीने ढोरकीन येथील वीजपुरवठा १० ते १५ मिनिटांत सुरळीत होतो, असे सांगून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीलाच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब होत असल्याचा दावा केला आहे. महावितरणने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीवर ठपका ठेवला. तर कंपनीने महावितरण वीजपुरवठा करीत नसल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Runway for water during festive season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.