सातबारासाठी धावपळ
By Admin | Updated: June 24, 2017 23:40 IST2017-06-24T23:39:48+5:302017-06-24T23:40:41+5:30
परभणी : आॅनलाईन सातबारा काढण्यासाठी शासनाच्या सातबारा पोर्टलची गती धिमी झाल्याने शेतकऱ्यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

सातबारासाठी धावपळ
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आॅनलाईन सातबारा काढण्यासाठी शासनाच्या सातबारा पोर्टलची गती धिमी झाल्याने शेतकऱ्यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. एक सातबारा काढण्यासाठी ३ ते ४ तासांचा वेळ लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
राज्य शासनाने महसूल विभागाचा कारभारही आता आॅनलार्इंन केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या सातबारा आॅनलार्इंन तयार करण्यात आल्या आहेत.एखाद्या शेतकऱ्याला सातबारा हवी असल्यास महा ई- सेवा केंद्रावर जावून सातबारा काढावी लागते. त्यानंतर तहसीलदारांची स्वाक्षरी घेऊन ही सातबारा शासकीय कामकाजासाठी ग्राह्य धरली जाते. सध्या खरीप पेरण्यांचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना पैशांची अडचण भासत असून पेरण्यांसाठी पीककर्ज काढण्याची धावपळ सुरु आहे. राज्य शासनाने पीककर्जासाठी तातडीची मदत म्हणून १० हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. किचकट अटी आणि शर्थींचे पालन केल्यानंतरही अडचणी संपत नाहीत. पीककर्ज काढण्यासाठी सातबारा आवश्यक आहे. परंतु, नेमकी हीच सातबारा शेतकऱ्यांना वेळेत मिळत नाही. परिणामी पीककर्ज काढताना तारेवरची कसरत कावी लागत आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये महा ई-सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन सातबारा मिळतात. मात्र मागील एक महिन्यापासून ‘आपले सरकार’ या पोर्टलवरील सातबाराचे पोर्टल संथ गतीने चालत आहे. एक सातबारा काढण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागतो. त्यातच सातबारा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने या पोर्टलची गती वाढवावी आणि सर्वांना वेळेत सातबारा मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.