अकरावी विज्ञान प्रवेशासाठी धावपळ

By Admin | Updated: June 16, 2015 00:50 IST2015-06-16T00:41:31+5:302015-06-16T00:50:14+5:30

लातूर : अकरावी विज्ञान प्रवेशासाठी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालय,

Running for Eleventh Science Entrance | अकरावी विज्ञान प्रवेशासाठी धावपळ

अकरावी विज्ञान प्रवेशासाठी धावपळ



लातूर : अकरावी विज्ञान प्रवेशासाठी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयांत विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे़ याशिवाय अन्य महाविद्यालयांतही अकरावी प्रवेशाची उत्सुकता दिसून येत आहे़
लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेसाठी ५ हजार २३१ विद्यार्थ्यांच्या नावाची चेकलिस्ट (पडताळणी सुची) १४ जून रोजी लावण्यात आली़ या पडताळणी सुचितील त्रुटींची दुरुस्ती १५ जून रोजी ४ वाजेपर्यंत स्विकारण्यात आली़ १७ जून रोजी सकाळी ११ वाजता पहिली निवड यादी आरक्षण व गुणवत्तेनुसार जाहीर करण्यात येणार आहे़ १७ ते १९ जून या कालावधीत पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी शुल्क भरुन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे़ २१ जून रोजी दुसरी निवड यादी आरक्षण व गुणवत्तेनुसार जाहीर केली जाणार आहे़ दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी २१ व २२ जून रोजी आपले प्रवेश निश्चित करावेत़ या यादीनंतर जागा शिल्लक राहिल्यास तिसरी निवड यादी २३ जून रोजी लावण्यात येईल़ इयत्ता ११ वी वर्गात प्रवेश मिळालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांची संयुक्त बैठक २८ जून रोजी होऊन नियमित वर्गाची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येणार असल्याचे उपप्राचार्य स्मिता दुरुगकर-दगडे यांनी सांगितले़
लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयात १६ जून रोजी चेकलिस्ट लावली जाईल़ सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७ हजार ६३३ विद्यार्थ्यांनी दयानंदमध्ये नाव नोंदणी केली असल्याचे प्रशासकीय अधिकारी दासराव सूर्यवंशी यांनी सांगितले़ १७ जून रोजी पहिली निवड यादी लागणार असून, दुसरी निवड यादी १९ जून रोजी लावली जाईल़ जागा शिल्लक असल्यास तिसरी निवड यादी २० जून रोजी लावण्यात येईल़ इयत्ता ११ वी वर्गात प्रवेश मिळालेल्या दयानंदच्या विद्यार्थी व पालकांची संयुक्त बैठक २४ जून रोजी होऊन नियमित वर्गाची सुरुवात २९ जूनपासून होणार असल्याचे दासराव सूर्यवंशी यांनी सांगितले़
श्री महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात पहिली निवड यादी २० जून रोजी लावली जाणार आहे़ दुसरी निवड यादी २३ जून रोजी तर तिसरी निवड यादी २ जूलै रोजी लावण्यात येणार आहे़ सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बसवेश्वर महाविद्यालयात ३ हजार ७०० विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आह़े, अशी माहिती प्राचार्य उमाकांत बिराजदार यांनी दिली़ बसवेश्वर महाविद्यालयात ११ तुकड्या असून विज्ञान शाखेच्या अनुदानीत तुकड्यांमध्ये ३६०, विनाअनुदानित तुकड्यांमध्ये २४० अशी प्रवेश क्षमता आहे़ कला शाखेत ३६० विद्यार्थी क्षमता आहे़ तर वाणिज्य शाखेत अनुदानीत २४० व विनाअनुदानीत १२० विद्यार्थी क्षमता आहे़ (प्रतिनिधी)
शाळेतील शिक्षणानंतर महाविद्यालयीन प्रवेशाच्या अनुषंगाने लागणारी प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची तहसील आवारात व सेतू सुविधा केंद्रात मोठी गर्दी दिसत होती. रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व, वयाचा दाखला आदी प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील आवारात गर्दी दिसत होती.

Web Title: Running for Eleventh Science Entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.