पावसासाठी देवाकडे धावा
By Admin | Updated: July 7, 2015 00:56 IST2015-07-07T00:29:12+5:302015-07-07T00:56:04+5:30
औरंगाबाद : मराठवाडा मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करीत असून, यावर्षी वेळेत पावसाचे आगमन झाले असले तरी पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारली आहे.

पावसासाठी देवाकडे धावा
औरंगाबाद : मराठवाडा मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करीत असून, यावर्षी वेळेत पावसाचे आगमन झाले असले तरी पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. पावसासाठी देवाकडे प्रार्थना करणे आणि शेतकऱ्यांनी धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्यापलीकडे दुसरा पर्याय नसल्याचे मत विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. उपलब्ध पाण्याचा वापर करून आहेत ती पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. विभागात ५० टक्क्यांच्या आसपास पेरण्या झालेल्या आहेत. काही जिल्ह्यांत पेरण्या झाल्या आहेत, तर काही जिल्ह्यांत झाल्याच नाहीत. उडीद, मुगाचे कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर तूर, बाजरी, सोयाबीनचे उत्पादन सरासरी गाठेल. पाऊस १५ ते ३० दिवस लांबला तर कराव्या लागणाऱ्या प्रशासकीय नियोजनाचा आराखडा तयार आहे, असेही ते म्हणाले.
निसर्गासमोर प्रशासकीय यंत्रणादेखील हतबल झाली असून, संकटांचा सामना करण्यासाठी जनमानसांचे धैर्य वाढविण्यासाठी विभागीय पातळीवर प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. आयुक्त म्हणाले, अधूनमधून अशा प्रकारे दुष्काळी परिस्थिती निर्माण होतेच. कधी पाऊस उशिरा येतो, तर कधी वेळेत पडतो.
येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जाणे गरजेचे आहे. तसेच देवाकडे प्रार्थनादेखील करावीच लागेल. पिकांची जोपासना केली जात आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर तातडीच्या उपाययोजना करणे शक्य नसते. जलयुक्त शिवारसारख्या योजनांमुळे फायदा होतो आहे. त्यावर आणखी दूरगामी काम करावे लागणार आहे.
मराठवाडा विभागात कमी पाऊस पडला असल्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याची घोषणा शासनाने केली आहे. याप्रकरणी नियोजनासंबंधी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विभागाचे ७७९ मि. मी. इतके पर्जन्यमान आहे. १२१ मि. मी. इतका पाऊस महिनाभरात झाला आहे.
४उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी जिल्ह्यांत कमी पाऊस झाला आहे. पाऊस लांबला तर देवाकडे धावा करण्याविना पर्याय नसल्याचे आयुक्त म्हणाले.