औरंगाबादमधील चोरट्यांच्या खंडाळ्यात आवळल्या मुसक्या
By Admin | Updated: March 10, 2017 21:00 IST2017-03-10T21:00:29+5:302017-03-10T21:00:29+5:30
गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या औरंगाबादमधील दोन अट्टल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेनं खंडाळा येथे सापळा लावून अटक केली

औरंगाबादमधील चोरट्यांच्या खंडाळ्यात आवळल्या मुसक्या
ऑनलाईन लोकमत
सातारा, दि. 10 - गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या औरंगाबादमधील दोन अट्टल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेनं खंडाळा येथे सापळा लावून अटक केली. या दोघांवर हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे आहेत. इजाज ऊर्फ रमेश काळे (वय २७), धीरज पवार (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इजाज काळे व धीरज पवार हे दोघे गुरुवारी दुपारी खंडाळा परिसरात संशयितरित्या फिरत होते.
पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांच्यासह टीमने सापळा लावून या दोघांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडे विना नंबरप्लेटची दुचाकी आणि दोन मोबाईल सापडले. या दोघांनी औरंगाबाद जिल्हा वाळुंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न तसेच बिडकेन पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीमध्ये फरार असून, या व्यतिरिक्त त्यांनी जबरी चोरी, घरफोडी व दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. या दोघांना पुढील तपासासाठी औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.