अफवांमुळे घडले जागरण
By Admin | Updated: August 20, 2014 23:54 IST2014-08-20T23:47:41+5:302014-08-20T23:54:16+5:30
नांदेड: जे झोपले ते झोपतीलच आणि जे जागे राहतील तेच जगतील अशी बाळबोध अफवा पसरल्याने मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे अनेकांचे जागरण घडले़

अफवांमुळे घडले जागरण
नांदेड: जे झोपले ते झोपतीलच आणि जे जागे राहतील तेच जगतील अशी बाळबोध अफवा पसरल्याने मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे अनेकांचे जागरण घडले़ त्याचवेळी भिती पसरविणारी भूकंपाची वार्ताही अनेकांनी दुरध्वनीवरुन दिली़ दरम्यान, लोकांना भयभित करणाऱ्या अफवाखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा पोलिसांनी दिला आहे़
एक बाळ जन्मले़़़ आणि जन्मल्याबरोबरच बोलू लागले़़़ जे कोणी जागे आहेत तेच जगतील़़़ झोपणारे झोपेतच संपतील अशी किंचितही न पटणारी अफवा मंगळवारी रात्री पसरविण्यात आली़ एक दिवस अगोदर ग्रामीण भागातही या अफवेचे पेव फुटले होते़ मध्यरात्री ३ वाजेनंतर नातेवाईकांचे एकमेकांना मोबाईलवरुन संदेश गेले़
त्याचवेळी नांदेड परिसरात भूकंप झाल्याच्या वार्ताही एकमेकांना कळविण्यात आल्या़ त्यामुळे शहरातील काही भागात लोक रस्त्यावर आले होते़ विशेषता ग्रामीण भागातील काही लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत जन्मलेले मुल अचानक बोलू लागले अशी अफवा समाजकंटकांनी पसरविली़
एकुणच पहाटेपर्यंत ही संपूर्ण अफवा असल्याचे समजल्याने लोकांनी अज्ञात अफवेखोरांचा निषेध नोंदविला़
अगोदरच पावसाअभावी चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्यांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद द्यावा अशीही मागणी झाली़ दरम्यान, पोलिसांनीसुद्धा या अफवा गांभिर्याने घेतल्या़ अशा पद्धतीचे दुरध्वनी करणाऱ्यांच्या मुळाशी जावून त्यांना शोधण्यासाठी नागरीकांनीही सहकार्य करावे जेणेकरुन अशा अफवा पसरविणाऱ्यांना पायबंद बसेल असे आवाहन पोलिसांनी केले़ (प्रतिनिधी)