चाकूर : चाकूर ग्रामीण रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन मंगळवारी आल्याने खळबळ उडाली़ बॉम्ब ठेवल्याची अफवा वाऱ्यासारखी चाकूर शहर व परिसरात पसरली़ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने बॉम्ब शोधक-नाशक पथकाला पाचारण केले़ रुग्णालयाची कसून तपासणी करण्यात आली़ परंतु बॉम्ब शोधक-नाशक पथकाच्या हाती बॉम्ब लागला नाही़ दरम्यान मंगळवारी दुपारी ३़३० वाजण्याच्या सुमारास आलेल्या निनावी फोनने मात्र पोलिसासह रुग्णालयाची तारांबळ उडाली़ चाकूर ग्रामीण रुग्णालयात दुपारी २ वाजता अधिपरिचारीका अंजली काळे या डयुटीवर आल्या होत्या़ रुग्णालयातील दुरध्वनीवर ३़३० वाजण्याच्या सुमारास फोन आला़ तुमच्या रुग्णालयात बॉम्ब ठेवण्यात आला आहे, असा संवाद समोरच्या अज्ञात व्यक्तीने केला आणि फोन बंद केला़ त्याचवेळी एका १८ महिन्याच्या बालकाला विषबाधा झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी आणले होते़ अधिपरिचारीका काळे यांनी त्या बालकावर उपचार करुन रुग्णालयातील सहकार्यांशी चर्चा केली़ फोन आल्याची माहिती तात्काळ चाकूर पोलिसांना दिली़ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपनिरिक्षक एम़एक़ोंदे, पोहेकॉ मोहन वलसे रुग्णालयात दाखल झाले़ त्यांनी शहानिशा करण्यास सुरुवात केली़ दरम्यान रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्याचे समजताच रुग्णालयातही भीतीचे वातावरण पसरले होते़ यावेळी रुग्णालयात एकूण १८ रुग्ण दाखल होते़ त्यापैकी ५ महिला प्रसुतीसाठी दाखल झालेल्या आहेत़ पोलिस कुमक अधिक मागवून संशयित साहित्याची तपासणी केली़(वार्ताहर)
चाकूर रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा
By admin | Updated: November 26, 2014 01:09 IST