खडखडाटामुळे सत्ताधाऱ्यांवर नामुष्की
By Admin | Updated: March 28, 2015 00:45 IST2015-03-28T00:10:19+5:302015-03-28T00:45:53+5:30
बीड : जिल्हा परिषदेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे २०१५-१६ चा अर्थसंकल्प सादर करताना शुक्रवारी सत्ताधाऱ्यांचा कस लागला

खडखडाटामुळे सत्ताधाऱ्यांवर नामुष्की
बीड : जिल्हा परिषदेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे २०१५-१६ चा अर्थसंकल्प सादर करताना शुक्रवारी सत्ताधाऱ्यांचा कस लागला. २८ कोटी ८७ लाख ४६ हजार ९३४ रूपयांच्या तुटीच्या अर्थसंकल्पावर मंजुरीची मोहोर उमटविण्यात आली. सर्वच विभागांच्या निधींना कात्री लावल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला नाही.
जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित हे अध्यक्षस्थानी होते. अर्थ व बांधकाम सभापती संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, महेंद्र गर्जे, कमल मुंडे, उपाध्यक्षा आशा दौंड, सीईओ नामदेव ननावरे, डेप्युटी सीईओ अशोक सिरसे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजन साळवी यांची उपस्थिती होती.
सभापती संदीप क्षीरसागर यांनी सर्वसाधारण सभेपुढे अर्थसंकल्प ठेवला. २०१४-१५ चे सुधारित व २०१५-१६ चे मूळ अंदाजपत्रक पं. स. उपकरांसह दुरूस्ती व देखभाल निधी शासनाकडून प्राप्त निधी, जमा खर्चाचे अंदाजपत्रकाचे वाचन झाले. त्यानंतर क्षीरसागर यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. अर्थसंकल्पाला एकमुखाने मंजुरी देण्यात आली.
२०१४-१५ मध्ये ११ कोटी ७२ लाख रूपये एवढी तरतूद होती. प्रत्यक्षात ४१ कोटी १३ लाख ५२ हजार रूपये इतका खर्च झाला. परिणामी वित्त विभागाकडे २८ कोटी ८४ लाख ७० हजार ९३४ रूपये इतके देणे शिल्लक आहे. चालू वर्षासाठी उणे २८ कोटी ८७ लाख ४६ हजार ९३४ रूपयांच्या अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात आली.
विभागनिहाय तरतूद अशी...
प्रशासन : (पदाधिकाऱ्यांचे मानधन, प्रवास खर्च, वाहनांचे इंधन, विद्युत खर्च आदी) ६४ लाख १६ हजार, सामान्य प्रशासन : ४८ लाख २३ हजार, शिक्षण : १ कोटी ३९ लाख ९ हजार, इमारत व दळणवळण : ५६ लाख ६० हजार, पाटबंधारे : १ लाख २ हजार, आयुर्वेद : २ हजार, सार्वजनिक आरोग्य : ३१ लाख २ हजार, आरोग्य स्थापत्य : ५० लाख, कृषी : ३ लाख ४ हजार, पशुसंवर्धन : ४ लाख २ हजार, समाजकल्याण १ कोटी २५ लाख ९ हजार, अपंग कल्याण व पुनर्वसन : २१ लाख ५ हजार, सामूहिक विकास : ४४ लाख ५ हजार, संकीर्ण (न्यायालयीन खर्च, मृत सैनिकांच्या वारसांना मदत, स्वागत समारोह, ग्रा. पं. यात्रा अनुदान, जि. प.कर्मचारी ठेव संलग्न योजना, दुर्धर आजारी रुग्णांसाठी आर्थिक सहाय्य) : ४ कोटी ७१ लाख २४ हजार
१२० शाळांत ई-लर्निंग
अर्थसंकल्पासाठी बोलावलेल्या सर्वसाधारण सभेत १२० शाळांमधील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग हा नाविण्यपूर्ण प्रकल्प राबविण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. वित्त आयोगातून १ कोटी २० लाख रूपये खर्च करून हा प्रकल्प राबविण्यात येईल. कृषी व बांधकाम सभापती संदीप क्षीरसागर यांनी ई-लर्निंगचा मुद्दा मांडला होता. उपाध्यक्षा आशा दौंड यांनीही सुरात सूर मिसळला.
पंडित-वनवेंमध्ये खडाजंगी
अर्थसंकल्प सादर करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच भाजप सदस्य दशरथ वनवे यांनी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी त्यांना रोखले. त्यामुळे वनवे संतप्त झाले. मी जेष्ठ सदस्य आहे, मला बोलू का देत नाही अशी ओरड केली. यावर तुम्ही नंतर बोला, असे मी म्हणालो असा खुलासा पंडित यांनी केला.
वारसांना मदत द्या
भाजप सदस्या उषा मुंडे यांनी दुर्धर आजारी रूग्णांना जि.प.कडून दिले जाणारे दहा हजार रूपयांचे सहाय्य वेळेत मिळत नाही हा मुद्दा मांडला. काही रूग्ण मयत झाले. त्यांच्या वारसांना मदत मिळायला हवी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. अध्यक्ष पंडित व सभापती सोनवणे यांनी वारसांना मदतीचा विचार केला जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)