‘एटीएम’मध्ये पुन्हा खडखडाट !

By Admin | Updated: April 9, 2017 23:37 IST2017-04-09T23:34:23+5:302017-04-09T23:37:27+5:30

उस्मानाबाद : नोटबंदीत विस्कळीत झालेली राष्ट्रीयकृत बँकांची ‘एटीएम’ सेवा आजही कायम आहे़

Rumble again at ATM | ‘एटीएम’मध्ये पुन्हा खडखडाट !

‘एटीएम’मध्ये पुन्हा खडखडाट !

उस्मानाबाद : नोटबंदीत विस्कळीत झालेली राष्ट्रीयकृत बँकांची ‘एटीएम’ सेवा आजही कायम आहे़ विशेष म्हणजे रविवारची सुटी असो किंवा सण-वाराची सुटी असो या दिवशी एटीएम मशीनमधून पैसे मिळणे म्हणजे ‘नशिबच’ अशी उद्विग्न प्रतिक्रीया ग्राहक देत आहेत़ या व्यथा बँक प्रशासनाकडे मांडल्यानंतरही या गैरसोयीकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप होत आहे़ रविवारी दुपारी उस्मानाबाद शहरातील जवळपास २२ एटीएममध्ये खडखडाट होता़ तर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातही परिस्थिती वेगळी नव्हती़
जिल्हा बँक डबघाईला आल्यामुळे शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांनीही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते काढून व्यवहार करण्यावर भर दिला आहे़ राष्ट्रीयकृत बँकांची शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शाखांची परिस्थिती खूपच बिकट आहे़ ग्रामीण भागातील शाखांमध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अनेकवेळा ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो़ राष्ट्रीयकृत बँकेत खाते असेल तर गाव, शहर सोडून इतरत्रही पैैशांचा व्यवहार करता येतो़ विशेषत: रोकड घेऊन फिरण्याऐवजी एटीएम मशीनद्वारे पैैसे काढता येत असल्याने अनेकांनी या राष्ट्रीयकृत बँकांमधून व्यवहार सुरू केले आहेत़ मात्र, राष्ट्रीयकृत बँकांची एटीएम सेवा पूर्णत: विस्कळीत होताना दिसत आहे़ दैैनंदिन कामकाजाच्या दिवशी तास-तास रांगेत थांबून ग्राहकांना पैैसे काढावे लागतात़ एका ठिकाणी दोन एटीएम मशीन असतील तर त्यातील एकाच मशीनद्वारे पैैसे काढता येतात़ तर अनेक एटीएम मशीनमध्ये दिवसाही पैसे नसतात. सुटीच्या दिवशी एटीएममध्ये जावे की नाही ? हाच प्रश्न अनेकवेळा पडतो़ विशेषत: सुटी आणि सणवाराच्या दिवशी एटीएममधील खडखडाट हा नित्याचाच झाला आहे़
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरात विविध राष्ट्रीयकृत बँकांचे जवळपास २२ एटीएम मशीन आहेत़ शहरातील शिवाजी चौक, बसस्थानक परिसरात जवळपास पाच एटीएम मशीन आहेत़ जिल्हा प्रशासकीय इमारतीच्या समोरील भागात तीन एटीएम मशीन आहेत़ तर जिजाऊ चौक परिसरात दोन, तांबरी विभागाच्या मार्गावर दोन, समता नगर भागात तीन, मारवाड गल्ली भागात तीन, गणेश नगर, ख्वॉजानगर आदी भागात या एटीएम मशीन आहेत़ रविवारी दुपारी १२ ते २ या वेळेत यातील बहुतांश एटीएम मशीनमध्ये पैैशांचा खडखडाट होता़ विशेषत: पैैसे काढण्यासाठी आलेल्या शहरी, ग्रामीण भागातील नागरिकांना एटीएम मशीनमध्ये पैैसे नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागला़ विशेषत: रविवारी उस्मानाबाद शहरातील आठवडी बाजार असतो़ या बाजाराच्या दिवशी जिल्ह्यासह परिसरातील व्यापारी, शेतकरी येथे येतात़ त्यांनाही एटीएममधील पैशांच्या खडखडाटामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला़
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहर नगर पालिका असलेले शहर आहे़ या शहरासाठी केवळ एकच एटीएम मशीन असून, ही मशीनही रविवारी बंद पडली होती़ येथून जवळच असलेल्या अणदूरमधील एटीएमची परिस्थिती काही वेगळी नव्हती़ नळदुर्गसह अणदूर हे शहर धार्मिक, ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे़ मात्र, एटीएममध्ये खडखडाट राहत असल्याने या भागातील ग्राहकांसह पर्यटकांसह भाविकांना सतत गैरसोयीचा सामना करावा लागतो़ अशीच अवस्था नगर पंचायत असलेल्या लोहारा शहरात दिसून आली़ लोहारा शहरातील दोन्ही एटीएममध्ये पैशांचा खडखडाट होता़ संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर आज रविवार असून, सुटीमुळे पैसे संपले असतील, असे सांगण्यात आले़ उस्मानाबाद तालुक्यातील येडशी या गावात तीन एटीएम आहेत़ या तिन्ही एटीएममध्ये महिन्यातून काहीच दिवस पैसे मिळतात़ इतर वेळी मात्र, ग्राहकांना थेट उस्मानाबाद शहर गाठून पैसा काढावा लागत आहे़ जिल्ह्यातील इतर शहरी, ग्रामीण भागातील एटीएमची परिस्थितीही अशीच आहे़ परंडा शहरातील तिन्ही एटीएम मशीनमध्ये रविवारी खडखडाट होता़
रविवार हा सुटीचा दिवस असल्याने या दिवशी मिळणाऱ्या वेळेत साहित्याची खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो़ मात्र, सुटीच्याच दिवशी एटीएम मशीनमध्ये खडखडाट असल्याचे दुर्देवी चित्र शहरात सतत दिसून येत आहे़ विशेषत: ग्रामीण भागात असणाऱ्या एटीएम मशीनमधील पैैसे संपले तर ते आठ-आठ दिवस भरण्यात येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत़ शहरी, ग्रामीण भागातील नागरिकांनी बँक प्रशासनाकडे तक्रारी केल्या तरी त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही़ विशेषत: रोकड भरणाऱ्या एजन्सीलाही जाब विचारण्याचे औदार्य बँक प्रशासन दाखवित नाही़ ग्राहकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांसाठी कर लावण्यात येतो़ मात्र, तरीही सुरळीत सेवा मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे़ संबंधित अधिकाऱ्यांनी एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या एजन्सीला आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Rumble again at ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.