सत्ताधारी ‘बॅकफूट’वर !

By Admin | Updated: February 1, 2015 00:57 IST2015-02-01T00:56:03+5:302015-02-01T00:57:25+5:30

उस्मानाबाद : प्रत्येक सभेत, बैठकीत सदस्यांकडून विविध बाबी सूचविल्या जातात. परंतु, सत्ताधारी त्या गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करीत

The ruling 'Backfoot'! | सत्ताधारी ‘बॅकफूट’वर !

सत्ताधारी ‘बॅकफूट’वर !


उस्मानाबाद : प्रत्येक सभेत, बैठकीत सदस्यांकडून विविध बाबी सूचविल्या जातात. परंतु, सत्ताधारी त्या गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करीत शिवसेनेसह काँग्रेसच्या सदस्यांनी शनिवारी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी पहिल्यांदाच अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी नांगी टाकल्याचे शनिवारी उस्मानाबाद पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिसून आले.
नगराध्यक्ष सुनील काकडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास सभेला सुरूवात झाली. विषयांच्या वाचनास प्रारंभ करताच शिवसेनेच्या नगरसेविका प्रेमाताई पाटील, काँग्रेसचे खलील सय्यद, मधुकर तावडे, शिवसेनेचे सोमनाथ गुरूव यांनी सत्ताधारी पक्ष पालिका सदस्यांच्या सूचना, तसेच त्यांनी सुचविलेले प्रश्न गांभीर्याने घेतले जात नसल्याचा आरोप केला. प्रेमाताई पाटील यांनी आदर्शनगर भागातील नाली बांधकामाचा विषय उपस्थित केला. मागील अनेक बैठकांमध्ये चर्चा होवूनही हा प्रश्न का मार्गी लागत नाही असा सवाल त्यांनी केला. आदर्शनगर भागातील या कामाबाबत स्पष्ट भूमिका जाहिर करा, त्यानंतरच बैठकीला सुरूवात करा, असा आग्रह त्यांनी धरला. पाटील यांच्या या मागणीला काँग्रेसच्या नगरसेवकांनीही साथ दिली. त्यामुळे जवळपास अर्धातास पालिकेत गोंधळाचे वातावरण होते. अखेर अध्यक्ष सुनील काकडे आणि सीओ शशीमोहन नंदा यांना नमते घ्यावे लागले. सभेत आश्वासन दिल्यानंतरच पुढील कामकाजाला सुरूवात झाली.
त्यानंतर काही विषयांना सभेत मंजुरी मिळाल्यानंतर घरांवरील छतावर ‘सोलार ग्रीड’ बसवून वीज निर्मिती करण्याबाबतचा विषयही मंजुरीसाठी सभागृहासमोर आला. यावरूनही विरोधक चांगलेच आक्रमक झाले. सोलार ग्रीड या विषयावर सभागृहात कुठल्याही स्वरूपाची चर्चा झालेली नाही, कृती आराखडा तयार नाही, कोणाच्या हरकती मागविल्या नाहीत, असे असतानाही हा विषय मंजुरीसाठी ठेवलाच कसा? असा सवाल विरोधकांनी केला. त्यानंतरही सत्ताधारी सदस्य हा विषय मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करीत होते. सत्ताधारी विरोधकांचे न ऐकता आपले घोडे पुढे दामटत असल्याचे लक्षात आल्यानंतर विरोधकांनी या विषयावर सभागृहात मतदान घेण्याची मागणी केली. सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बहुमत असले तरी सभेवेळी सभागृहामध्ये सात ते आठ सदस्य उपस्थित नव्हते. त्यामुळे हा विषय पुढील बैठकीत ठेवण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांना घ्यावा लागला.
प्रभागनिहाय कचरा उचलण्याचीे टेंडर देण्यात आली आहेत. त्यावेळी ‘स्वच्छ व सुंदर’ शहराचे स्वप्न दाखविण्यात आले. परंतु, संबंधित कंत्राटदारांकडून साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सोमनाथ गुरव व राजाभाऊ पवार यांनी सभागृहात केला. काँग्रेसनेही हा विषय उचलून धरला. त्यावर कंत्राटदारांची बिले काढण्यापूर्वी नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा निर्णय झाला. भोगावती पात्राची साफसफाई केल्याबाबतचे बिलही मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.
परंतु, या बिलाची रक्कम जास्त असल्याचा आरोप विरोधकांनी केला. या मुद्दयावरही सत्ताधाऱ्यांना बॅकफूटवर यावे लागले. काम आणि बिलाची तपासणी केल्यानंतरच या बिलांना मंजुरी द्यावी असा निर्णय यावेळी घ्यावा लागला. बैठकीला नगराध्यक्ष सुनील काकडे, उपनगराध्यक्ष खलीपा कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष अमित शिंदे, माजी सभापती विशाल साखरे, पृथ्वीराज चिलवंत, अभय इंगळे, मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
सर्वसाधारण सभेला किमान सत्ताधारी पक्षातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असते. परंतु, शनिवारी झालेल्या सभेत वेगळेच चित्र पहावयास मिळाले. सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांचीच संख्या जास्त होती. काहीजण गैरहजर राहिले. तर काहीजण स्वाक्षऱ्या करून निघून गेले. नगरसेवकांच्या अनुपस्थितीबाबत पालिका परिसरात तर्क -वितर्क लावले जात होते. दरम्यान, शनिवारच्या या सर्वसाधारण सभेत हद्दवाढ भागातील प्रश्न, स्मशानभूमीमध्ये सुविधा पुरविणे, अग्निशमन दलासाठी साहित्य खरेदी, नाट्यगृहासाठी वीज कनेक्शन, पाईपलाईनची गळती, संगणक खरेदी आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.

Web Title: The ruling 'Backfoot'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.