तुकड्याने वाटली रस्त्यांची खिरापत
By Admin | Updated: July 3, 2014 00:19 IST2014-07-02T23:50:29+5:302014-07-03T00:19:00+5:30
चेतन धनुरे, लातूर ई-निविदा प्रक्रियेमुळे मर्जीतील गुत्तेदारांचे खिसे भरणे कठीण झाल्याने आता कामांचे तुकडे पाडून पळवाट शोधली जातेय

तुकड्याने वाटली रस्त्यांची खिरापत
चेतन धनुरे, लातूर
ई-निविदा प्रक्रियेमुळे मर्जीतील गुत्तेदारांचे खिसे भरणे कठीण झाल्याने आता कामांचे तुकडे पाडून पळवाट शोधली जातेय. अगदी एका किलोमीटर रस्त्याचे चार-चार तुकडे पाडून हव्या त्या गुत्तेदारास कामाचे वाटप केले जात आहे. असाच काहिसा आरोप जिल्हा परिषदेच्या बांंधकाम विभागावर डागला गेला आहे. त्यात तथ्य असल्याचेही आता हळुहळू समोर येऊ लागले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते कामांचा घोळ समोर आल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानेही तोच कित्ता गिरविलेला समोर आला आहे. भाजपाचे गटनेते रामचंद्र तिरुके यांना जिल्हा परिषदेतीलच अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी माहितीतून रस्त्यांचा गोलमाल उघड झाला. एकिकडे वित्त विभागाने वर्षभरात १६० रस्ते कामांची बिले काढल्याचे लेखी स्वरुपात दिले आहे. तर दुसरीकडे बांधकाम विभागाने मात्र १०८ कामांचीच यादी सादर केली आहे. त्यामुळे उर्वरित ६२ कामांची बिले कशी निघाली, यावरून आता जिल्हा परिषदेत चर्चाचर्वण सुरू झाले आहे. त्यातही ४७ कामांवर गटनेत्यांनी गोलमालीचा संशय व्यक्त केला आहे. ही कामे झालीच नसल्याचा दावा करून जवळपास अडीच ते तीन कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ४७ पैकी केवळ १ काम वगळता सर्वच कामांची किंमत बरोब्बर ५ लाख रुपये ठरविण्यात आली असल्याने संशयाचे धुके दाट झाले आहेत. कामाची किंमत इतकीच ठरविण्यामागेही ई-निविदा प्रक्रियेची भीती दडल्याचे दिसते. १० लाख रुपयांवरील कामे ई-निविदेनुसार करावी लागत असल्याने अगदी दोनशे ते अडीचशे मीटर कामाचे आदेश काढून रक्कम कमी केली जात आहे. जेणेकरून ई-निविदा काढावी लागणार नाही व मर्जीतील गुत्तेदारासच काम देता यावे. उदाहरणादाखल सांगावयाचे झाल्यास हासेगाव ते भुसणी रस्ता ०/०० ते ०/२५०, हासेगाव ते भुसणी रस्ता ०/२५० ते ०/५००, हासेगाव ते भुसणी रस्ता ०/५०० ते ०/७०० असा ७०० मीटर्स अंतराचा रस्ता तीन तुकड्यांत विभागून त्यावर १५ लाख खर्च केले गेले आहेत. ‘कामाची निकड लक्षात घेऊन’ असे गोलमाल उत्तर देत या तुकड्यांचेही समर्थन केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वर्षभरात बाभळगावी ७० लाखांची कामे : रामचंद्र तिरुके
एसआरएफ योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०१३ ते १४ या एक वर्षाच्या कालावधीत बाभळगावाशी जोडणाऱ्या ११ रस्त्यांचे काम केल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यावर ७० लाख रुपये खर्चण्यात आले आहेत. दोनवेळा मुख्यमंत्री व एकवेळा केंद्रीय मंत्री राहिलेल्या दिवंगत विलासराव देशमुख यांच्या बाभळगावी एवढी मागास अवस्था होती का? ज्यामुळे वर्षभरात इतकी कामे करावी लागली, असा सवाल भाजपा गटनेते रामचंद्र तिरुके यांनी केला आहे.
बाभळगाव ते सारोळा, बाभळगाव ते सिकंदरपूर, बाभळगाव ते धनेगाव, ग्रामीण मार्ग १३३ ते बाभळगाव, वैशाली नगर ते बाभळगाव, इतर जिल्हा मार्ग १७ ते वैशाली नगर, बाभळगाव ते कातपूर, ग्रामीण मार्ग १३३ ते बाभळगाव, बाभळगाव ते राज्यमार्ग २३६, इतर जिल्हा मार्ग १२४ ते बाभळगाव, इतर जिल्हा मार्ग १७ ते बाभळगाव-धनेगाव रस्ता, राज्यमार्ग १४५ ते बाभळगाव-धनेगाव रस्ता यावर तिरुके यांनी दाट संशय व्यक्त केला.
बांधकाम विभागातील रस्त्यांविषयीचा हा प्रकार आपणास व सभापतींना अंधारात ठेवूनच झाल्याचा संशय आहे. त्यामुळे आम्ही या प्रकारातील तथ्य जाणून घेत आहोत.
येत्या चार दिवसांत पडताळणी पूर्ण करून सत्य सर्वांसमोर मांडण्यात येईल.
-दत्तात्रय बनसोडे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, लातूर