रुईकर यांनी केले सव्वा कोटींचे नुकसान
By Admin | Updated: March 19, 2016 20:23 IST2016-03-19T20:09:16+5:302016-03-19T20:23:42+5:30
परभणी : येथील तहसीलदार संतोष रुईकर यांनी अवैध वाळू वाहतुकीच्या दंडाची वसुली केली नाही.

रुईकर यांनी केले सव्वा कोटींचे नुकसान
परभणी : येथील तहसीलदार संतोष रुईकर यांनी अवैध वाळू वाहतुकीच्या दंडाची वसुली केली नाही. तसेच वाळू साठ्याचे लिलाव वेळेत केले नसल्याने ते चोरीला गेल्यामुळे महसूल विभागाचे १ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकरणी त्यांना वैयक्तिक जबाबदार धरुन ही रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी तसेच रुईकर यांची विभागीय चौकशी करावी, अशी शिफारस उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्याकडे केली आहे.
परभणी तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने १ कोटी १९ लाख २१ हजार ११० रुपयांची ९ हजार ९८४.१८ ब्रास अवैध वाळू महसूल विभागाने जप्त केली होती. या वाळूसाठ्याचा लिलाव करुन मिळालेली रक्कम महसूल विभागाच्या खात्यावर जमा करणे आवश्यक होते. परंतु, या साठ्यांचा लिलावच झाला नाही. महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हे वाळूसाठे जागेवरुन गायब झाले होते. वाळू चोरीला गेली असली तरी महसूल विभागाने गुन्हेही दाखल केले नव्हते. परभणीतील एका शासकीय कंत्राटदाराला महसूल विभागाकडून वाळू हवी असल्याने त्याने तहसील कार्यालयाकडे जप्त केलेल्या वाळूसाठ्याची योग्य ती रक्कम भरण्याची तयारी दर्शवत वाळूची मागणी केली. त्यानंतर महसूलच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचा शोध घेतला असता हे वाळूसाठे गायब झाल्याचे दिसून आले.
यासंदर्भात ‘लोकमत’ने २१ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी जप्त केलेल्या वाळू साठ्यांची माहिती तहसीलदार संतोष रुईकर यांच्याकडे मागितली. त्यावेळी रुईकर यांनी ७३ वाळूसाठ्यांची यादी स्वाक्षरी न करता शिंदे यांना दिली. यावेळी शिंदे यांनी या वाळूसाठ्यांना भेट देऊन अहवाल देण्याचे आदेश रुईकर यांना २ व ३ मार्च रोजी दिले होते. रुईकर यांनी जप्त वाळूसाठ्यापैकी ८ वाळूसाठ्यांचा लिलाव करुन ६ लाख १४ हजार ५०० रुपयांचा महसूल जमा केला असल्याची माहिती सादर केली. उर्वरित वाळूसाठ्यांची माहिती दिली नाही. त्यामुळे महसूल विभागाचे १ कोटी १३ लाख रुपयांचे नुकसान झाले असून या नुकसानीची जबाबदारी तहसीलदार रुईकर यांच्यावर निश्चित करावी, असा अहवाल सुभाष शिंदे यांनी जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांना दिला आहे.
तसेच अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून दंड वसूल न केल्याने दंडाची १२ लाख ५० हजार रुपयांची रक्कम असा एकूण १ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचा महसूल तहसीलदार रुईकर यांच्यामुळे मिळाला नाही. त्यामुळे या नुकसानीला त्यांना वैयक्तिक जबाबदार धरुन त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करावी तसेच त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशीही शिफारस या अहवालात शिंदे यांनी केली आहे. हा अहवाल १६ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जप्त केलेली वाळू चोरीला जाणे ही गंभीर बाब आहे. यासंदर्भात संंबंधित गावांतील तलाठी, मंडळ अधिकारी, पोलिस पाटील यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून खुलासा आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करुन दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. कामात कुचराई करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. शिंदे यांनी दिलेला अहवाल बाहेरगावी असल्याने पाहिला नाही. शुक्रवारी सायंकाळी परभणीत येत आहे. त्यानंतर उद्या हा अहवाल पाहून योग्य ती कारवाई केली जाईल.
- राहुल महिवाल, जिल्हाधिकारी
...या गावांमधील वाळू गेली चोरीला
परभणी शहर व तालुक्यातील ७३ ठिकाणचे वाळूसाठे चोरीला गेले आहेत. त्यामध्ये पोखर्णी, कोटंबवाडी, ब्रह्मपुरी, संबर, ब्राह्मणगाव, नरसापूर, दामपुरी, अंगलगाव, धसाडी, माळसोन्ना, खानापूर, बोरवंड, सिंगणापूर, आंबेटाकळी, वडगाव, भारस्वाडा, धर्मापुरी या गावांसह परभणी शहरातील गंगाखेडरोड, देवकृपा गॅरेज बाजुला, गोदावरी टायर बाजुला , काकडेनगर, दुधडेअरी जवळ, गंगाखेड आईस फॅक्ट्रीसमोर, विश्वभारती प्राथमिक शाळेसमोर, लोहगावरोड, गंगाखेडरोड, शहाणे कॉलनी, भाग्यनगर, कल्याणनगर, बेलेश्वरनगर, धनलक्ष्मीनगर, एकनाथनगर, लक्ष्मीनगर, जिंतूररोड, खॉजा कॉलनी या ठिकाणांचा समावेश आहे. वाळू साठा करणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेक दिग्गजांची नावे आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.