रुद्रेश्वर बंधाऱ्याच्या भिंतीला धोका
By Admin | Updated: September 14, 2014 00:20 IST2014-09-14T00:17:38+5:302014-09-14T00:20:57+5:30
सोयगाव : येथून जवळच असलेल्या रुद्रेश्वर बंधाऱ्यात पाण्याची पातळी वाढली असून, सांडव्यातून पाणी निघत नसल्यामुळे बंधाऱ्याच्या भिंतीला धोका निर्माण झालेला आहे.

रुद्रेश्वर बंधाऱ्याच्या भिंतीला धोका
सोयगाव : येथून जवळच असलेल्या रुद्रेश्वर बंधाऱ्यात पाण्याची पातळी वाढली असून, सांडव्यातून पाणी निघत नसल्यामुळे बंधाऱ्याच्या भिंतीला धोका निर्माण झालेला आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून, गलवाडा येथील ग्रामस्थांनी चारी खोदून पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सोयगाव येथून जवळच गलवाडा गावाजवळ रुद्रेश्वर लेणीच्या पायथ्याशी एक पाझर तलाव आहे. लघु पाटबंधारे विभागाचा हा बंधारा सन १९९२ नंतर पहिल्यांदाच भरला. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या पाझर तलावात यंदा प्रचंड पाणी साचले. तलावाला मोठ्या धरणाचे स्वरूप आले आहे. या तलावाचा सांडवा चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे, त्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहत नाही. आतापर्यंत जास्त पाणी न आल्यामुळे धोका जाणवला नाही; परंतु ७ व ८ रोजी झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची पातळी वाढली. सांडव्यातून पाणी निघत नसल्यामुळे भिंतीच्या पिचिंगच्या किती तरी वर पाणी आले. दररोज पाणी वाढत आहे; परंतु पाणी बाहेर निघण्यास वाव नसल्याने भिंतीला धोका निर्माण झाला आहे. धरणाखालील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. असेच पाणी वाढत राहिल्यास भिंतीवरून पाणी जाऊन धरण फुटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. धरणातील पाणी पाहता धरणाखालील शेतीसह गलवाडा गावालादेखील या धरणापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी सरपंच जीवन पाटील व मंडळ अधिकारी व्ही. टी. जाधव यांच्याकडे समस्या मांडली, तेव्हा जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. नंदू हजारी, विजय बिर्ला, कैलास इंगळे, दत्तू इंगळे, अशोक इंगळे, धनराज औरंगे, मुन्ना ढगे, रमेश गव्हांडे आदींनी चारी खोदून पाणी बाहेर काढले. या धरणाकडे विशेष लक्ष देऊन सांडव्याद्वारे पाणी कसे बाहेर पडेल, यासाठी तालुका प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली आहे.