आरटीओच्या कॉमन सर्व्हिस सेंटरचा वाहनधारकांना भुर्दंड
By Admin | Updated: February 10, 2017 21:32 IST2017-02-10T21:32:41+5:302017-02-10T21:32:41+5:30
आरटीओ कार्यालयाने जिल्ह्यात कॉमन सर्व्हिस सेंटर(सीएससी)च्या माध्यमातून विविध कामकाजाची सुविधा केली आहे. मात्र...

आरटीओच्या कॉमन सर्व्हिस सेंटरचा वाहनधारकांना भुर्दंड
संतोष हिरेमठ/ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 10 - आरटीओ कार्यालयाने जिल्ह्यात कॉमन सर्व्हिस सेंटर(सीएससी)च्या माध्यमातून विविध कामकाजाची सुविधा केली आहे. मात्र ही कामे करताना वाहनधारकांना शासनाच्या शुल्काव्यतिरिक्त २० रुपये अदा करावे लागत आहेत. याचा वाहनधारकांना चांगलाच भुर्दंड बसत आहे. यातून या सेंटर्सच्या तिजोरीत महिन्याकाठी लाखो रुपयांची भर पडणार आहे. शिवाय सीएससी सेंटरमुळे आरटीओतील शुल्क स्वीकारणारे कक्षच बंद केले जात आहे. त्यामुळे हे सीएससी सेंटर म्हणजे आरटीओ कार्यालयासाठी ह्यकॅशियर से छुटकाराह्णच ठरत आहेत.
जिल्ह्यातील ६०० सीएससी सेंटर्सवर आरटीओच्या कामकाजाची सुविधा देण्यात आली आहे. आॅनलाईन अर्ज, कागदपत्रे अपलोड, शुल्क भरणे आदी कामे या ठिकाणी करता येत आहेत. त्याचा वाहनधारकांना मोठा आधार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त आहे. परंतु त्यासाठी शासकीय शुल्काशिवाय वाहनधारकांना २० रुपये सेवा शुल्क द्यावे लागत आहे. त्यामुळे आरटीओ कारर्यालयाच्या कामकाजाचे एकप्रकारे खाजगीकरण करण्यात येत आहे का, असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित होत आहे. सीएससी सेंटरबरोबरच आरटीओ कार्यालयातर्फे इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, के्रडिट कार्डद्वारे आॅनलाईन शुल्क भरण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या सुविधेमुळे आता कार्यालयात शुल्क स्वीकारणारे रोखपाल कमी करण्यात येत आहे. ६ फेब्रुवारीपासून शिकाऊ वाहन परवान्याचे (लर्निंग लायसन्स) शुल्क स्वीकारणे बंद करण्यात आले. त्यामुळे शुल्क भरण्यासाठी शहरातील सीएससी सेंटरची शोधाशोध करण्याची वेळ उमेदवारांवर येत आहे. आता १ मार्चपासून तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या शिबीर कार्यालयामध्ये रोखपालामार्फत शुल्क स्वीकारणे बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी), नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे आॅनलाईन पद्धतीने शुल्क भरणा केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. लवकरच पर्मनंट लायसन्ससह इतर कामकाजाचेही शुल्क स्वीकारणे बंद होईल. त्यामुळे २० रुपयांच्या सेवा शुल्कातून सीएससी सेंटर्स चालक मात्र मालामाल होणार आहे.
दररोज लर्निंगसाठी २४० अपॉॅइंटमेंट
आरटीओ कार्यालयात दररोज २४० उमेदवारांना लर्निंग लायसन्ससाठी अपॉॅइंमेंट दिली जाते. यानुसार सीएससी सेंटरवरून अर्ज भरणे, शुल्क भरणे यासाठी प्रत्येक उमेदवारास २० रुपये याप्रमाणे २४० उमेदवारांकडून ४ हजार ८०० रुपये आकारले वसूल होतात. महिन्याकाठी हा आकडा १ लाख ४४ हजार रुपयांवर जातो.
दररोज पर्मनंटसाठी १८०अपॉॅइंटमेंट
आरटीओत दररोज १८० वाहनचालकांना पर्मनंट लायसन्ससाठी अपॉॅइंमेंट मिळते. यानुसार सीएससी सेंटरवरून अर्ज भरणे, शुल्क भरण्याच्या कामातून प्रतिउमेदवार २० प्रमाणे दररोज ३ हजार ६०० रुपये होतात. महिन्याला हा आकडा १ लाक ८ हजार रुपयांवर जातो.
बदल स्वीकारून एजंटांचा कारभार
आरटीओ कार्यालयातील एजंटगिरीला चाप बसण्यासाठी आॅनलाईन प्रणालीसह सीएससी सेंटरच्या माध्यमातून कामकाजावर भर दिला जात आहे. परंतु एजंटांनी बदल स्वीकारून कारभार सुरूच ठेवला आहे. लॅपटॉप, इंटरनेट, डेबीट, के्रडीट कार्ड, मोबाईल बॅकिंगच्या माध्यमातून उमेदवारांची कामे करीत आहे. त्यामुळे एजंटगिरीच वाढत आहे.
केंद्रातूनच निर्णय
शुल्क वाढ असो की अन्य काही आरटीओ कार्यालयासंदर्भातील निर्णय हे केंद्रातून होतात. सीएससी सेंटरसंदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाने निर्णय घेतला. शिवाय आचाररसंहिता असल्याने याविषयी काही सांगता येणार नाही.
-दिवाकर रावते, परिवहन मंत्री