आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:04 IST2021-06-11T04:04:37+5:302021-06-11T04:04:37+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पुणे येथे ७ एप्रिलला काढलेल्या सोडतीत जिल्ह्यातील ६०३ शाळांमधील ३ ...

आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पुणे येथे ७ एप्रिलला काढलेल्या सोडतीत जिल्ह्यातील ६०३ शाळांमधील ३ हजार ६२५ विद्यार्थ्यांना आरटीईतून प्रवेशाची संधी देण्यात आली. शाळांनी त्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिल्याने प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
आरटीई लाॅटरीत प्रवेश निश्चिती झालेल्या मुलांच्या पालकांना १५ एप्रिलपासून संदेश जाण्यास सुरुवात झाली होती. परंतु, लॉकडाऊन वाढविल्याने प्रवेशाची पुढील प्रक्रिया स्थगित होती. ती सुरू करून शाळा स्तरावर कागदपत्र पडताळणीची मागणी आरटीई पालक संघाच्या वतीने प्रशांत साठे यांनी केली होती. त्या मागणीला यश आले असून, प्रवेश प्रक्रिया आज, शुक्रवारपासून शाळास्तरावर सुरू करा, पालकांना शाळांनी पोर्टलवर वेळ द्यावी व पोर्टलवरच प्रवेश निश्चिती करावी, प्रवेशासाठी २० दिवसांचा कालावधी द्या, निवड यादीमधील पालकांनी वेळेत प्रवेश न घेतल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. अर्जात चुकीची माहिती भरलेली आढळल्यास तात्पुरता प्रवेश देऊ नये. ज्या पालकांना शाळेत येणे शक्य नाही. त्यांनी शाळेला दूरध्वनी, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी. १०० टक्के प्रवेश होतील, याची खबरदारी शाळांनी घ्यावी. संपर्काअभावी प्रवेश झाला नाही, अशी तक्रार प्राप्त झाल्यास ती शाळेची सर्वस्वी जबाबदारी असेल. प्रवेशासंदर्भात अडचणी असतील त्यांनी तक्रार निवारण समितीकडे संपर्क साधावा. तसेच२०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर व्यापक प्रसिद्धी देण्याचे आदेश शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी शाळांना दिले आहेत.