दुष्काळी निधीचे १९० कोटी परत
By Admin | Updated: March 17, 2015 00:48 IST2015-03-17T00:27:34+5:302015-03-17T00:48:18+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतनिधीपैकी १९० कोटी रुपये परत शासनाकडे जमा करण्यात आले आहेत

दुष्काळी निधीचे १९० कोटी परत
औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतनिधीपैकी १९० कोटी रुपये परत शासनाकडे जमा करण्यात आले आहेत. तांत्रिक कारणांमुळे निधी परत गेला असला तरी अर्थसंकल्पात तरतूद होऊन तो पुन्हा मिळणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील सर्व साडेआठ हजार गावांची पैसेवारी पन्नासच्या खाली आलेली आहे. त्यामुळे शासनाने खरीप अनुदानापोटी शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मदतीचे पॅकेज दिले आहे. विभागातील ४३ लाख शेतकऱ्यांना ही वैयक्तिक मदत मिळणार आहे. त्यासाठी एकूण २०३२ कोटी रुपये लागणार आहेत. राज्य सरकारने यापैकी १६९० कोटी रुपयांचा निधी विभागास उपलब्ध करून दिला होता.
७ मार्चपर्यंत त्यातील १५०० कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे. शासनाने ही रक्कम आकस्मिकता निधीतून उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी उरलेली रक्कम हिशेबासाठी शासनाकडे जमा करणे आवश्यक आहे. त्यानुसार उरलेले १९० कोटी रुपये शासनाकडे जमा करण्यात आले आहेत. आता अर्थसंकल्पात तरतूद होऊन ही रक्कम मराठवाड्याला पुन्हा दिली जाईल, असे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले.
४मराठवाड्यातील सर्व ४३ लाख शेतकऱ्यांना वैयक्तिक मदत देण्यासाठी एकूण २०३२ कोटी रुपये लागणार आहेत.
४आतापर्यंत २९ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. त्यामुळे उर्वरित १४ लाख शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून पाचशे ३२ कोटी रुपये निधी मिळणे आवश्यक आहे.