१० कोटींचा टंचाई आराखडा
By Admin | Updated: July 4, 2014 00:14 IST2014-07-03T23:23:01+5:302014-07-04T00:14:32+5:30
संजय तिपाले , बीड जून संपला, जुलै उजाडला; पण पाऊस काही बरसलाच नाही़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे़ या स्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन वेगाने कामाला लागले

१० कोटींचा टंचाई आराखडा
संजय तिपाले , बीड
जून संपला, जुलै उजाडला; पण पाऊस काही बरसलाच नाही़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे़ या स्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन वेगाने कामाला लागले असून तब्बल १० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे़ जि़प़ कडून हा आराखडा गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला़
जिल्ह्यात महिनाभरात केवळ २८ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे़ पेरणीचे क्षेत्र २ टक्क्यांच्या पुढे सरकायला तयार नाही़ एकूण जलाशयातील पाणीसाठी अवघा ७ टक्के इतका आहे़ पाऊस नसल्याने टंचाई दिवसेंदिवस उग्र रुप धारण करु लागली आहे़ आजघडीला ४५४ गावांमध्ये १९५ टँकरने पाणी पुरविले जाते़ आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर चित्र आणखी चिंताजनक बनणार आहे़ जिल्हा परिषदेने सर्व गटविकास अधिकाऱ्यांकडून आगामी तीन महिन्यांच्या काळातील स्थिती जाणून घेतली आहे़ त्यानुसार जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या महिन्यात टँकरचा आकडा तब्बल ४०० च्या घरात जाईल अशी शक्यता आहे़ माजलगाव वगळता सर्वच तालुक्यांना ंटंचाईची झळ बसणार आहे़ आकस्मिक टंचाई आराखडा सुमारे १० कोटी ७ लाख ५२ हजार रुपये इतक्या रक्कमेचा आहे़ टंचाई आराखड्याची माहिती जि़प़ मधून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे गेली आहे़ आता या आराखड्यानुसार उपाययोजनांना सुरुवात होणार आहे़
असा आहे अंदाजित खर्च
तालुका अंदाजित खर्च
बीड ७४ लाख ५ हजार
शिरुर ६१ लाख ४३ हजार
वडवणी १६ लाख ९४ हजार
आष्टी ५ कोटी ९८ लाख ५८ हजार
गेवराई ७ लाख ७१ हजार
पाटोदा ७८ लाख २३ हजार
अंबाजोगाई ५४ लाख ८५ हजार
केज ६० लाख ९७ हजार
धारुर ४४ लाख ८४ हजार
परळी ९ लाख ९२ हजार
एकूण १० कोटी ७ लाख ५२ हजार
प्रशासन सज्ज- नवलकिशोर राम
पावसाअभावी पाण्याची समस्या काही भागात गंभीर बनत असली तरी आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे़ सार्वजनिक विहिरींवर विद्युतपंप बसविण्याची योजना ७७ गावांमध्ये राबविली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले़ अंबाजोगाई, केज व धारुरसाठी काळवटी तलावात ४ कोटींची योजना कार्यान्वित केली जाईल़ केजमध्ये जाधवजवळा येथून पाणी आणले जाते़ आष्टीसाठी सीना धरणातून पाणी उपलब्ध केले जाईल़ याबाबत अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविल्याचेही ते म्हणाले़ प्रशासन टंचाई निवारणासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले़
उपाययोजना सुरू- जवळेकर
जिल्ह्यात गतवर्षी दुष्काळ होता़ यावर्षी जुलै सुरू झाला तरी पाऊस नाही़ संभाव्य धोका लक्षात घेऊन १० कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे़ हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला आहे़ टंचाई काळात कोठेही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशी माहिती सीईओ राजीव जवळेकर यांनी दिली़ गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत सूचित केले आहे़ मग्रारोहयोची कामे वाढवून रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर असल्याचेही त्यांनी सांगितले़