बुडतेय कोट्यवधींची रॉयल्टी

By Admin | Updated: July 20, 2014 00:33 IST2014-07-20T00:19:26+5:302014-07-20T00:33:04+5:30

चेतन धनुरे , लातूर ‘पळत्याच्या पाठी ब्रम्हराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे महसूल विभागाची अवस्था झाली आहे़

Royalty of billiards billions | बुडतेय कोट्यवधींची रॉयल्टी

बुडतेय कोट्यवधींची रॉयल्टी

चेतन धनुरे , लातूर
‘पळत्याच्या पाठी ब्रम्हराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे महसूल विभागाची अवस्था झाली आहे़ एकिकडे परवाना नसतानाही भराभर उपसा करुन रॉयल्टी बुडवीत बिनबोभाट गौण खनिजाची विक्री सुरु आहे़ दुसरीकडे परवाने घेऊन अतिरिक्त उपसा केलेल्या खाण पट्टेधारकांना लाखों रुपयांच्या रॉयल्टीच्या नोटिसा धाडल्या गेल्या आहेत़ नियमानुसार परवानाधारकांकडून ही वसुली होणे आवश्यकच आहे़ परंतु, विनापरवाना उपसा करणाऱ्यांना वाहन सापडल्यास केवळ किरकोळ दंड आकारुन सोडण्यात येत आहे़
लातूर जिल्ह्यात अवैध गौण खनिजाचा अक्षरश: बाजार मांडला गेला आहे़ महसूल विभागानेच शोधून काढलेल्या अवैध खाणींतून कोट्यवधींचे गौण खनिज चोरी झाल्याचे समोर आले़ शिवाय, परवाना असलेल्या अनेक खाणपट्ट्यातूनही भरलेल्या रॉयल्टीपेक्षा अधिक गौण खनिजाचा उपसा झाला आहे़ त्यामुळे परवानाधारकाकडून त्यांनी उपसलेल्या अतिरिक्त गौण खनिजाची रॉयल्टी वसूल करण्याची कार्यवाही सध्या तहसील स्तरावरुन सुरु झाली आहे़ एकिकडे ही कारवाई सुरु असतानाच अवैध खाणपट्ट्यातील उपसा मात्र अजूनही थांबलेला नाही़
लातूर तालुक्यात प्रशासनास केवळ दोन अवैध खाणपट्टे आढळून आले आहेत़ परंतु, प्रत्यक्षात त्यांची संख्या याहून कैकपटीने अधिक आहे़ आखरवाई, चिखुर्डा, अंकोली, मुरुड अकोला, गातेगाव भागात अवैध खाणपट्टे सुरुचआहेत़ येथून उपसा केले जाणारे गौण खनिज लातूर शहरात विक्री केले जाते़ सरासरी ३ ब्रास क्षमता असणाऱ्या जवळपास ३० ते ४० वाहनांतून या गौण खनिजाची वाहतूक केली जात आहे़ एका वाहनाच्या दररोज सरासरी ५ ट्रीपा होत असल्याची माहिती विक्रीच्या पॉर्इंटवरील एका वाहनचालकाकडे सहज चौकशी केली असता मिळाली़ म्हणजेच सरासरी ५०० ब्रास गौण खनिजाची वाहतूक सध्या सुरु आहे़ ज्याची रॉयल्टी १ लाख रुपये होते़ वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी किमान २०० ते २५० दिवस जरी वाहतूक झाली तरी २ ते २़५ कोटी रुपयांची रॉयल्टी मिळू शकते़ परंतु, प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष केले जात आहे़
वाहन पकडले गेल्यास महसूल विभागाकडून ५२०० किंवा ७४०० रुपये दंडाची पावती फाडली जाते़ इतक्या किरकोळ कारवाईवरच महसूल विभागाची ‘तहान’ भागते (?)़ वास्तवात चोरुन आणलेल्या वाहनधारकाकडे कसून चौकशी करीत त्याने गौण खनिज कोठून आणले, याचा शोध घेतल्यास विनापरवाना खाणपट्ट्यांची ‘खाण’ महसूलला सापडू शकते़ परंतु, त्याकडे दुर्लक्ष करुन केवळ दंडावरच भागविले जात आहे़ ज्यामुळे कोट्यवधींची रॉयल्टी बुडत आहे़
ईटीएस मोजणीतही लपवाछपवी़़़
जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा यांनी पुढाकार घेऊन ईटीएस प्रणालीद्वारे जिल्ह्यातील गौण खनिजाचा अचूक उपसा मोजण्याचा उपक्रम हाती घेतला़ पहिल्या टप्प्यातील मोजणीतच बरेच पितळ उघडे पडले़ सध्या दुसऱ्या टप्प्यातील मोजणी सुरु आहे़ मात्र आता काही परवानाधारक मोठ्या खाणी लपवून खाणीच्या जागेची पुरेसी माहिती नसलेल्या बाहेरील पथकाला छोट्या खाणी दाखवीत त्यांचे मोजमाप करुन घेत आहेत़
जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासानजीकच विक्री़़़
जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाच नंबर चौक परिसरात अवैैध गौण खनिजाची विक्री केली जाते़ याठिकाणी दिवसभर अनेक वाहने थांबून असतात़ तरीही महसूल विभागाचे याकडे लक्ष नसल्याचेच दिसून येत आहे़

Web Title: Royalty of billiards billions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.