शिवसेनेतील वादावर राऊत यांच्या नियुक्तीचा तोडगा
By Admin | Updated: July 1, 2014 00:13 IST2014-07-01T00:09:14+5:302014-07-01T00:13:33+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आ. गजाननराव घुगे, माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा व माजी खा. सुभाष वानखेडे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी पक्षातील

शिवसेनेतील वादावर राऊत यांच्या नियुक्तीचा तोडगा
हिंगोली : जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आ. गजाननराव घुगे, माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा व माजी खा. सुभाष वानखेडे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी पक्षातील वजनदार नेते खा. विनायक राऊत यांची नियुक्ती करून या वादावर तोडगा काढण्याचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केला गेला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकावयास मिळत आहे.
जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कमालीचा अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. जि. प. अध्यक्ष पदाच्या निवडीवरून झालेला हा वाद मिटता मिटत नसल्याने पक्षातील वरिष्ठ नेतेही नाराज झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत माजी आ. गजाननराव घुगे व डॉ. जयप्रकाश मुंदडा आणि माजी खा. सुभाष वानखेडे यांच्यातील वाद मिटेल, या उद्देशाने शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी प्रारंभी बबनराव थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. थोरात यांची घुगे व डॉ. मुंदडा यांच्याशी जवळीक वाढल्याची तक्रार करण्यात आल्याने थोरात यांना हटवून त्या जागी सुहास सामंत यांची पक्षाने जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली. सामंत यांच्या नियुक्तीने शिवसेनेतील अंतर्गत वाद मिटेल, अशी अपेक्षा असताना झाले उलटेच. बहुतांश कार्यक्रमांमध्ये माजी खा. वानखेडे व संपर्क प्रमुख सुहास सामंत उपस्थित होते, त्या कार्यक्रमांना घुगे व डॉ. मुंदडा अनुपस्थित राहिले. सामंत हे वानखेडे गटाला झुकते माप देतात, अशीही चर्चा या माजी आमदारद्वयांच्या समर्थकांकडून होताना दिसून आली. अशातच शुक्रवारी वसमत येथे सुहास सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बैठकीनंतर डॉ. मुंदडा यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला. यासंदर्भात पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल झाला. यासंदर्भातील तक्रार ‘मातोश्री’ वर करण्यात आली आणि रविवारी पक्षाने जिल्हा संपर्क प्रमुख बदलण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोणातून शिवसेनेतील वजनदार नेते व कोकणामध्ये उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वर्चस्वाला हादरा देणारे खा. विनायक राऊत यांची जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
जिल्ह्यातील नेत्यांमधील मतभेदावर तोडगा काढण्याच्या दृष्टिकोणातून खा. राऊत यांची नियुक्ती केल्याचे जाहीर होताच माजी आ. गजाननराव घुगे यांच्या समर्थकांनी कळमनुरीत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. त्यामुळे घुगे, डॉ. मुंदडा आणि वानखेडे यांच्या वादात कोण-कोणावर मात केली, याची चर्चा आता जिल्ह्यात होताना दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत कुठलेही मतभेद नको, या दृष्टिकोणातून करण्यात आलेली राऊत यांची नियुक्ती पक्षाला संजिवनी देणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळातून होताना दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)