पावसाने दगा दिल्याने मोसंबीला लागली घरघर

By Admin | Updated: August 21, 2015 00:38 IST2015-08-21T00:29:50+5:302015-08-21T00:38:57+5:30

गजेंद्र देशमुख , जालना राज्यभरात मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यात यंदा पावसाने अवकृपा केल्याने मोसंबी लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे

The rosemary got rosy due to rains | पावसाने दगा दिल्याने मोसंबीला लागली घरघर

पावसाने दगा दिल्याने मोसंबीला लागली घरघर


गजेंद्र देशमुख , जालना
राज्यभरात मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यात यंदा पावसाने अवकृपा केल्याने मोसंबी लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. दुष्काळामुळे नगदी पीक असूनही मोसंबीकडचा कल कमी झाल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत २६३.२१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जी सरासरीपेक्षाही कमी आहे. अत्यल्प पावसामुळे खरीप पिकांची वाट लागली. रबीचाही भरोसा कमी आहे. पारंपरिक पिकांतून मिळणारे अत्यल्प उत्पादन पाहून अनेक शेतकऱ्यांनी मोसंबी या फळपिकाकडे आपला मोर्चा वळविला होता. मात्र गत तीन ते चार वर्षांपासून पाऊस दगा देत असल्याने नगदी पिकही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.
एरवी कर्ज काढून मोसंबी लागवड करणारे शेतकरी मोसंबीची दुबार लागवड करण्याचा विचार करीत आहेत. थोडक्यात आहे ते मोसंबी क्षेत्रही घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र २५ हजार हेक्टर एवढे आहे. त्यात उत्पादनक्षम क्षेत्र २१ हजार हेक्टरच्या आसपास आहे. यावर्षीही अत्यल्प पाऊस झाल्याने लागवडीखाली असलेल्या फळबागाही धोक्यात आल्या आहेत. त्या जगवाव्यात कशा असा शेतकऱ्यांसमोरचा मोठा प्रश्न आहे. काही ठिकाणी ठिबक करण्याइतपही पाणी नसल्याने मोसंबी मोडावी लागण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
जालना, अंबड, घनसावंगी, परतूर, बदनापूर या तालुक्यात मोसंबीचे क्षेत्र जास्त आहे. भोकरदन, मंठा, जाफराबाद तालुक्यात मोसंबचीे क्षेत्र कमी आहे. सर्वच तालुक्यात मोसंबीचे लागवडी क्षेत्र वगळता नवीन क्षेत्र वाढण्याची चिन्हे नाहीत. आगामी काळात पाऊस न झाल्यास बाग जगवित शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे कृषी अभ्यासक नंदकिशोर पूंड यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांनी डाळिंब लागवड वाढविल्याचे पूंड सांगतात. मोसंबीपेक्षा अत्यल्प पाणी डाळिंब बागेस लागते.जिल्हा कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे म्हणाले, पाऊस नसल्याने फळबाग लागवड क्षेत्र वाढणार नाही. आहे त्या बागा शेतकऱ्यांना जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे तांभाळे यांनी सांगितले.

Web Title: The rosemary got rosy due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.