उभ्या चारचाकींनी घोटला रस्त्यांचा गळा
By Admin | Updated: July 8, 2014 01:06 IST2014-07-08T00:51:27+5:302014-07-08T01:06:16+5:30
औरंगाबाद : जालना रोडसह विविध भागांत भर रस्त्यावर चारचाकी वाहने उभी केली जात असल्यामुळे अन्य वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

उभ्या चारचाकींनी घोटला रस्त्यांचा गळा
औरंगाबाद : जालना रोडसह विविध भागांत भर रस्त्यावर चारचाकी वाहने उभी केली जात असल्यामुळे अन्य वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर बेकायदा उभी केलेली ही वाहने वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष दिसते.
आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर मोठी व मध्यम चारचाकी वाहने उभी केली जात असल्यामुळे रस्ता अधिकच अरुंद होतो. त्याचा त्रास अन्य वाहनचालकांना होतो. रस्त्यावर नो पार्किंगच्या जागी काही मिनिटांसाठीही दुचाकी उभी केली तरी ती उचलली जाते; परंतु अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या या चारचाकी वाहनांवर काही कारवाई होताना दिसत नाही.
ठराविक वाहनांवर कारवाई करताना वाहतुकीला अडथळा निर्माण केलेल्या या चारचाकी वाहनांवरही कारवाईची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.जालना रोडवर चिकलठाण्यापासून तर थेट महावीर चौकापर्यंत ठिकठिकाणी थेट रस्त्यावर चारचाकी वाहने उभी असतात.
जालना रोड
1जालना रोडवर मोंढा नाका ते आकाशवाणी चौक आणि आकाशवाणी चौक ते सेव्हन हिल उड्डाणपुलापर्यंत ठिकठिकाणी भररस्त्यावर अवजड तसेच चारचाकी वाहने उभी केलेली असतात. अशाच पद्धतीने सेव्हन हिल उड्डाणपूल ते आकाशवाणी, आकाशवाणी ते मोंढा नाका रस्त्यावर वाहने उभी केली जातात. अदालत रोडवरही अशीच स्थिती दिसते. आकाशवाणी चौक, मोंढा नाका या ठिकाणी वाहतूक पोलीस असूनही चौकात उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही.
कॅनॉट प्लेस
2कॅनॉट प्लेस परिसरात दुकानांसमोरील रस्त्यावर दिवसभर वाहने उभी असतात. वाहनचालकवाहन रस्त्यावर आडवे वा बेशिस्तपणे उभे करून दुकानांमध्ये जातात. अशा पद्धतीने एका जागी वाहन उभे करून ते खरेदीसाठी निर्धास्त फिरत असतात.
औरंगपुरा, निरालाबाजार
3औरंगपुरा, निराला बाजार, पैठणगेट हे भाग बाजारपेठेचे आहेत. दिवसा व सायंकाळीही येथे गर्दी दिसून येते. वाहन उचलून नेले जाण्याच्या भीतीने या भागात रस्त्यावर दुचाकी लावताना वाहनचालक अनेकदा विचार करतात; परंतु चारचाकी वाहने या ठिकाणी उभी केलेली दिसतात.
अन्य भागांतही हीच स्थिती
4मिलकॉर्नर, सिडको, त्रिमूर्ती चौक, गजानन महाराज मंदिर चौकासह अन्य भररस्त्यावर वाहने उभी केलेली दिसतात; परंतु मोजक्या भागातच वाहतूक पोलिसांची कारवाई होताना दिसते.
नियमितपणे कारवाई
रस्त्यावर चारचाकी वाहने उभी केल्यास नियमितपणे कारवाई केली जाते. अशा वाहनांना जॅमर लावले जाते. त्यांच्या चालक, मालकांना दंड ठोठावला जातो. रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई सुरू असते, असे सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) अजित बोऱ्हाडे यांनी सांगितले.
अपघाताचा धोका
अनेक रस्त्यावर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. अशा कोंडीतून मार्ग काढताना उभ्या केलेल्या वाहनांवर धडकल्यामुळे अपघातही होतात.