छतावरले पाणी शोषखड्ड्यांत !
By Admin | Updated: September 11, 2014 01:08 IST2014-09-11T00:49:39+5:302014-09-11T01:08:19+5:30
हणमंत गायकवाड , लातूर गावातले पाणी गावात अन् शिवारातले पाणी शिवारात मुरविण्याचा उपक्रम लातूर प्रशासनाने हाती घेतला आहे. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता

छतावरले पाणी शोषखड्ड्यांत !
हणमंत गायकवाड , लातूर
गावातले पाणी गावात अन् शिवारातले पाणी शिवारात मुरविण्याचा उपक्रम लातूर प्रशासनाने हाती घेतला आहे. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. एवढेच नव्हे तर छतावरचे पाणीही शोषखड्ड्यांत मुरविण्यात येत आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या या ‘लातूर पॅटर्न’मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने आघाडी घेतली आहे. शहर व जिल्ह्यातील एकूण २२ शासकीय इमारतींच्या छतावरील पाणी जमिनीत मुरविण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या ४९ लाख रुपयांच्या निधीतून शोषखड्ड्यांत पाणी मुरविले आहे.
लातूर जिल्ह्यात गतवर्षी कमी पर्जन्यमान झाले. यंदाही तशीच परिस्थिती आहे. त्यासाठी पावसाचा थेंबन् थेंब जमिनीत मुरविण्याशिवाय गत्यंतर नाही. जिल्हा परिषद तसेच नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून रेनवॉटरचा उपक्रम हाती घेण्यात आला. पावसाळ्यापूर्वीच जिल्ह्यातील २२ इमारतींवरील छतावरील पाणी शोषखड्ड्यात मुरविण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. २२ पैकी २१ ठिकाणचे काम पूर्णही झाले आहे. पावसाचे छतावर पडलेले पाणी पाईपलाईनद्वारे बोअरच्या परिसरात आणले. त्या ठिकाणी दोन मीटर खोल व तीन मीटर रुंदीचा शोषखड्डा तयार करण्यात आला. या शोषखड्ड्यांमध्ये २० एमएमची खडी टाकण्यात आली. खालून ४० सें.मी. पर्यंतचा भाग या खडीने भरून घेतला. त्यावर २ एम.एम.ची खडी टाकण्यात आली. त्यानंतर त्यावर वाळू टाकण्यात आली. तेथून वरील दोन फुटांपर्यंतच्या भागाचे बांधकाम करण्यात आले आणि या शोषखड्ड्यात छतावरील पाणी पाईपलाईनद्वारे सोडण्यात आले. २१ ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला आहे. ४९ लाख रुपये खर्च करून रेनवॉटर हार्वेस्टिंगचा हा उपक्रम राबविण्यात आल्याने परिसरातील बोअरचे पाणी वाढले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विहिरीची पाणीपातळी रेनवॉटर हार्वेस्टिंगमुळेच वाढली आहे.
जिल्हा परिषदेने इमारतींच्या छतावरील पाणी जमिनीत मुरविण्यासाठी शासनाचा निधी खर्च न करता लोकसहभागातून खर्च केला आहे. मात्र जलसंधारणाच्या कामासाठी शासनाचा निधी वापरला. २०१३-१४ मध्ये ४० लाख व २०१४-१५ मध्ये ६० लाखांच्या निधीतून नालासरळीकरण तसेच अन्य जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. पावसाचा थेंबन् थेंब यंदा अडविण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो असल्याचेही जि.प. अध्यक्ष बनसोडे यांनी सांगितले.
प्रशासकीय इमारत, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, रेणापूर तहसील व न्यायालय, चाकूर तहसील व न्यायालय, औसा न्यायालय, मुरुड येथील शासकीय विश्रामगृह, पोलिस ठाणे, पोलिस निवासस्थाने, लातूर येथील महिला शासकीय तंत्रनिकेतन, गुलमोहर वसतिगृह, नंदनवन वसतिगृह, नवीन वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदपूर न्यायालय व तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या छतावरील पाणी पाईपलाईन करून शास्त्रीय पद्धतीने केलेल्या शोषखड्ड्यात मुरविण्यात आले आहे. एका कामावर कमीत कमी ८० हजार व जास्तीत जास्त अडीच लाखांपर्यंतचा खर्च करण्यात आला आहे. ४८ लाखांत ही कामे पूर्ण झाली आहेत. अन्य एक काम शिल्लक आहे. त्यावर एक ते दीड लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
छतावरील पाणी वाहून वाया जाऊ नये, त्याच ठिकाणी मुरवून त्याचा पेयजलात वापर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या ४९ लाख रुपयांच्या निधीतून २१ इमारतींच्या छतावरील पाणी मुरविले आहे.
४यंदाच्या पावसाळ्यात या इमारतींच्या छतावर पडलेले पाणी तेथेच मुरविण्यात यश आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक बडे, उपकार्यकारी अभियंता एम.एन. गायकवाड यांनी सांगितले. रेनवॉटर हार्वेस्टिंगची २२ पैकी २१ कामे पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पंचायत समितीच्या इमारती तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामपंचायतींच्या इमारतींच्या छतावर पडलेले पावसाचे पाणी यंदा वाया जाऊ दिले नाही. लोकसहभागातून जिल्ह्यातील ८०० शाळा, ५०० ग्रा.पं. इमारतींच्या छतावरील पाणी शोषखड्ड्यात मुरविण्यात आले आहे. शासनाचा रुपयाही खर्च न करता लोकसहभागातून पाणी मुरविण्यात आले असल्याचे जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी सांगितले.