४० आरोग्य केंद्रांना मिळणार छताचा आधार
By Admin | Updated: March 27, 2015 00:26 IST2015-03-27T00:26:18+5:302015-03-27T00:26:18+5:30
जालना : जिल्ह्यात एकूण ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे असून या जवळपास सर्वच ठिकाणी पावसाळ्यात छतांना गळती लागते.

४० आरोग्य केंद्रांना मिळणार छताचा आधार
जालना : जिल्ह्यात एकूण ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे असून या जवळपास सर्वच ठिकाणी पावसाळ्यात छतांना गळती लागते. त्यामुळे या इमारतींवर टीन छताची उभारणी करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य सभापती ए.जे. बोराडे यांनी दिली.
पावसाळ्यात शस्त्रक्रियागृह व प्रसुतिगृहांच्या गळतीमुळे जून ते आॅगस्ट या कालावधीत कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे काम पूर्णपणे ठप्प झालेले असते.
प्रसुतिगृह गळत असल्यामुळे त्या ठिकाणी प्रसूती करण्यासाठी अडचणी उद्भवतात. त्यामुळे आपण स्वत: याबाबतचा प्रस्ताव राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे दाखल केल्याचे सभापती बोराडे यांनी सांगितले.
या प्रस्तावामध्ये इमारतीवर तीन फूट उंचीवर टीनशेडची उभारणी केल्यास पावसाळ्यातील इमारतींची गळती थांबून रूग्णसेवेतील अडचणी दूर होतील. एका प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी साधारणत: ४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
याप्रमाणे ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १ कोटी ६० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ही नाविन्यपूर्ण व रूग्णहिताची योजना राबविण्यासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे, असेही सभापतींनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)