पोलिस ठाण्याचे छत कोसळले, एका घराची भिंत पडली
By Admin | Updated: July 24, 2014 00:28 IST2014-07-24T00:03:29+5:302014-07-24T00:28:24+5:30
हिंगोली : सर्वांना वाट पहायला लावणाऱ्या पावसाने आता पिच्छा पुरवायला सुरूवात केली आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिपने पाचव्या दिवशी झडीचे रूप धारण केले.
पोलिस ठाण्याचे छत कोसळले, एका घराची भिंत पडली
हिंगोली : सर्वांना वाट पहायला लावणाऱ्या पावसाने आता पिच्छा पुरवायला सुरूवात केली आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिपने पाचव्या दिवशी झडीचे रूप धारण केले. त्याआधी मंगळवारी रात्रभर झालेला पाऊस बुधवारी देखील कायम राहिल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
जिल्ह्यात चार दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे; मात्र या पावसात जीव नसल्याने तितकासा परिणाम जाणवत नाही; परंतु मंगळवारी रात्रीपासून पावसात वाढ झाल्याने संततधार स्वरूपात पाऊस सुरू झाला. यंदा पावसाच्या आगमनापासून सर्वाधिक पाऊस मंगळवारी झाला.
जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या या पावसाने पूर्वीच्या ७६ मिमीच्या सरासरीत १६.३१ मिमीची भर टाकली; मात्र आधीच उशिरा सुरू झालेल्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सध्या पेरण्यात अंतिम टप्प्यात असताना पावसात खंड पडला नाही. उलट मंगळवारी पावसात अधिकच वाढ झाल्याने शेतकऱ्यांना पेरण्या बंद कराव्या लागल्या. बुधवारी सकाळपासून सूर्यदर्शन झालेले नाही. शिवाय संततधार पाऊस कायम राहिल्याने हिंगोली शहरातील वाहतूकीवर परिणाम झाला. रस्ते चिखलमय झाले, काही ठिकाणी नाल्यांचे पाणी रस्त्यांवर आले. या पावसामुळे सेनगाव तालुक्याने सरासरीची शंभरी तर औंढा तालुक्याने सव्वाशी पार केली आहे. मंगळवारी दिवसभरात हिंगोली तालुक्यात ११.८६, कळमनुरी १६.८३, वसमत १४.४३ मिमी पाऊस झाला. याहीपेक्षा औंढा नागनाथ तालुक्यात १८.७५ तर सेनगाव तालुक्यात १९.६७ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे पेरलेले बियाणे निघणार असल्याने शेतकरी आनंदात आहे.
हिंगोलीत भिंत पडली
सलग चार दिवस पाणी मुरल्यामुळे हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागातील मनोज तुकाराम पोहळकर यांच्या घराची भिंत बुधवारी पडली. घरातील मंडळी घरी असताना पाठीमागील बाजूची भिंत अचानक कोसळली. सुदैवाने ही भिंत घराबाहेर पडल्याने जीवित हानी झाली नाही. शिवाय पाठीमागील बाजूस मोकळी जागा असल्याने कोणालाही इजा पोहचली नाही; परंतु पोहळकर यांचा संसार उघड्यावर पडला. दुपारी ३ वाजेपर्यंत पाऊस सुरूच राहिल्याने पोहळकरांना अन्नधान्य तसेच संसार उपयोगी साहित्याची झाकाझाकी करावी लागली.