रोहयोत अपहार; सरपंचाला अटक
By Admin | Updated: September 18, 2014 00:41 IST2014-09-18T00:21:14+5:302014-09-18T00:41:30+5:30
पाचोड : पैठण तालुक्यातील पारुंडी येथे रोजगार हमी योजनेतील ८७ लाखांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांपासून फरार असलेल्या सरपंचाला बुधवारी सकाळी गाअटक केली आहे.

रोहयोत अपहार; सरपंचाला अटक
पाचोड : पैठण तालुक्यातील पारुंडी येथे रोजगार हमी योजनेतील ८७ लाखांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांपासून फरार असलेल्या सरपंचाला बुधवारी सकाळी गावातच फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पाचोड पोलिसांनी अटक केली आहे.
पाचोडपासून जवळच असलेल्या पारुंडी तांडा गावात २००६ ते २०१३ या वर्षात रोजगार हमी योजनेमधून मातीनाला बांधकाम, रोपवाटिका काम, शेततळे, जोडरस्त्याच्या कामासाठी शासनाकडून एक कोटी २० लाख ९१ हजार ५०९ रुपयांच्या कामाची मंजुरी मिळाली होती. यानंतर ही कामे सुरू झाली व १ कोटी ७ लाख ५०१ रुपये कामावर खर्च केल्याचे सांगण्यात आले. मात्र कामे न झाल्याची तक्रार डॉ. अरुण भीमराव राठोड व कल्याण भीमराव राठोड यांनी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. या तक्रारीवरून एका पथकाने पारुंडी तांडा गावाला भेट देऊन पाहणी केली. ग्रामसभा घेतली, चावडी वाचन घेतले. या योजनेत काही कामे झालीच नाहीत, असे ३५ अधिकाऱ्यांच्या पाहणीतून निदर्शनास आले. नंतर जाबजबाब घेऊन या पथकाने आपला अहवाल विभागीय आयुक्त व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला. यानंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गोरख पवार यांनी रोजगार हमी योजनात ८७ लाख ५९ हजार ९६० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी प्रदीप काकडे, सरपंच बाजीराव राठोड, कनिष्ठ अभियंता कमलाकर शिंदे, कनिष्ठ अभियंता डी.सी. फणसे, शाखा अभियंता व्ही.जी. कुलकर्णी, तत्कालीन ग्रामसेवक कारभारी गव्हाणे, तत्कालीन ग्रामसेवक शिवाजी वावरे, तत्कालीन ग्रामसेवक सुभाष पाटील, शेख इप्तेखार यांच्याविरुद्ध १९ मार्च २०१४ रोजी पाचोड ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.