रोहित्रांची दुरुस्ती संथगतीने..!
By Admin | Updated: December 23, 2016 00:19 IST2016-12-23T00:18:26+5:302016-12-23T00:19:38+5:30
जालना: जिल्ह्यातील रोहित्रांची स्थिती बिकटच आहे. महावितरणचे दोन्ही विभाग मिळून शंभरपेक्षा अधिक रोहित्रांची दुरूस्ती अद्याप रखडलेली आहे.

रोहित्रांची दुरुस्ती संथगतीने..!
जालना: जिल्ह्यातील रोहित्रांची स्थिती बिकटच आहे. महावितरणचे दोन्ही विभाग मिळून शंभरपेक्षा अधिक रोहित्रांची दुरूस्ती अद्याप रखडलेली आहे. परिणामी शेतकरी तसेच वीज ग्राहकांची गैरसोय होत आहे.
जिल्ह्यात महावितरणचे विभाग क्रमांक एक व दोन अंतर्गत १०० व ६३ केव्हीए क्षमतेचे १५ हजार रोहित्र आहेत. रोहित्रांची संख्या मोठी असली तरी जळण्याचे प्रमाणही तेवढेच आहे. विभाग एक अंतर्गत जालना, बदनापूर, भोकरदन व जाफराबाद या तालुक्यांचा समावेश आहे. चार तालुक्यांतील १०० व ६३ क्षमतेचे ७० पेक्षा अधिक रोहित्र जळाले आहेत. हे सर्व रोहित्र जालना येथील विविध एजन्सीकडे दुरूस्तीसाठी आहेत. मात्र, महावितरणच्या संथगतीच्या कारभारामुळे रोहित्र दुरूस्तीची प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. तालुक्यातील शेतकरी रोहित्र दुरूस्तीसाठी कन्हैयानगर येथील कार्यशाळेत खेटे घालत आहेत. दिवसाकाठी प्रत्येक तालुक्यात आठ ते दहा रोहित्रांत बिघाड होत असल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात. तर विभाग दोनमध्ये अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तालुक्यांचा समावेश आहे. या विभागातातील सिंगज तसेच थ्री फेजचे मिळून ४० रोहित्र दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. वास्तवित पाहता रोहित्र दुरूस्तीस दिल्यावर आठवडाभराच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक गावांतील रोहित्र आठवड्यानंतरही मिळत नाही. पाच दुरूस्ती एजन्सी असूनही रोहित्र दुरूस्त होण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)