ट्रकचालकास मारहाण करून पाच लाखांचा ऐवज लुटला
By Admin | Updated: October 7, 2016 01:27 IST2016-10-07T00:43:43+5:302016-10-07T01:27:01+5:30
पाचोड : कपड्यांचे गठ्ठे घेऊन जाणारा ट्रक पाचोडनजीक लुटल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. चार अनोळखी दरोडेखोरांनी ट्रकमध्ये प्रवेश करून चालक

ट्रकचालकास मारहाण करून पाच लाखांचा ऐवज लुटला
पाचोड : कपड्यांचे गठ्ठे घेऊन जाणारा ट्रक पाचोडनजीक लुटल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. चार अनोळखी दरोडेखोरांनी ट्रकमध्ये प्रवेश करून चालक व क्लीनरला बेदम मारहाण केली व त्यांचे हात, पाय बांधून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. तसेच ट्रकमधील पाच लाख रुपयांचे कपड्यांचे गठ्ठेही त्यांनी चोरुन नेले.
सुरतहून हैैदराबादकडे जाणाऱ्या या ट्रकचा (ए.पी.२८-टी.ए.४६९३) वेग औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून आडगाव जावळे शिवारात कमी झाल्याने चार दरोडेखोरांनी या मालट्रक मध्ये प्रवेश केला. चालक व क्लीनरच्या डोळ्याला पट्ट्या बांधून त्यांना बेदम मारहाण केली व हात-पाय बांधून रस्त्याच्या बाजूला फेकून दिले.
ट्रकचालक शिवराज बाबूराव मेहेत्रे (रा. बीदर, कर्नाटक) यांच्या फिर्यादीवरुन पाचोड पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री चार अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला. चालक व क्लीनर राजू अमृत सांगूळे (२०) रा. मगदल जि. बीदर हे जखमी अवस्थेत कसेबसे रस्त्यावर आले व त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली. पाचोडचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी तातडीने औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांना माहिती दिली. रेड्डी यांनी घटनेचे गाभीर्य लक्षात घेता तातडीने सहायक पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना तात्काळ घटनास्थळी पाठविले. त्यांच्यासह पोलीस निरीक्षक महेश आंधळे, फौजदार नामदेव मद्दे, जमादार महादेव निकाळजे, नरेंद्र अंधारे आदींनी घटनास्थळी भेट दिली व नाकाबंदी केली. जालना, बीड व अहमदनगर पोलिसांनाही ही माहिती देण्यात आली. दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.