मुद्रांक विक्रेत्यांकडून सर्वसामान्यांची लूट
By Admin | Updated: June 8, 2014 00:53 IST2014-06-08T00:37:55+5:302014-06-08T00:53:22+5:30
माजलगाव: माजलगाव तहसील कार्यालय परिसरात मुद्रांक विक्रेत्यासह दलालांचे मोठे जाळे पसरले आहे.

मुद्रांक विक्रेत्यांकडून सर्वसामान्यांची लूट
माजलगाव: माजलगाव तहसील कार्यालय परिसरात मुद्रांक विक्रेत्यासह दलालांचे मोठे जाळे पसरले आहे. तालुक्यातून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची हे दलाल व मुद्रांक विक्रेते सर्रास लूट करीत असल्याचा आरोप जनतेमधून केला जात आहे. १०० रुपयांचा बॉन्ड खरेदी करण्यासाठी हे मुद्रांक विक्रेते वीस ते तीस रुपये वाढवून घेत सर्वसामान्यांची आर्थिक, लूट करताना दिसून येत आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलमध्ये दलालांचा मोठा बाजार भरला आहे. विद्यार्थी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक विविध कागदपत्रे काढण्यासाठी तहसील कार्यालयात येत असतात. आपली कागदपत्रे लवकर मिळावीत म्हणून हे नागरिक दलालांचा उपयोग करतात. आलेली संधी पाहून हे दलाल सर्वसामान्यांकडून वाढीव पैसे घेऊन त्यांची आर्थिक लूट करीत आहेत. तसेच शंभर रुपयांचा बॉन्ड खरेदी करावयाचा असेल तर हे मुद्रांक विक्रेते नागरिकांकडून वीस ते तीस रुपये वाढवून घेत असल्याचे दिसून येत आहे.
ही परिस्थिती मागील अनेक वर्षांपासून चालूच आहे. याकडे संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे बॉन्ड विकल्यानंतर खरेदीदाराला कुठलीही पावती दिली जात नाही. ही सर्वसामान्यांची आर्थिक लूट थांबवून मुद्रांक विक्रेते व दलालांवर योग्य ते निर्बंध घालावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. (वार्ताहर)