इंटरनेट कॅफेवर उमेदवारांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:14 IST2017-09-17T00:14:33+5:302017-09-17T00:14:33+5:30
मनपा निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. शनिवारी पहिल्या दिवशी अनेक इच्छुक उमेदवारांनी इंटरनेट कॅफेकडे धाव घेतली. इंटरनेट कॅफेधारकांनी या संधीचा लाभ उठवत अव्वाच्या सव्वा रक्कम इच्छुकांकडून उकळली.

इंटरनेट कॅफेवर उमेदवारांची लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मनपा निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. शनिवारी पहिल्या दिवशी अनेक इच्छुक उमेदवारांनी इंटरनेट कॅफेकडे धाव घेतली. इंटरनेट कॅफेधारकांनी या संधीचा लाभ उठवत अव्वाच्या सव्वा रक्कम इच्छुकांकडून उकळली.
अर्ज भरण्यासाठी ठरावीक रक्कम आकारण्याबाबत कोणत्याही सूचना महापालिकेने इंटरनेट कॅफेधारकांना, सेतू सुविधा चालकांना दिल्या नाहीत. त्याचाच लाभ उठवत उमेदवारांची लूट चालवली जात आहे. सध्या पितृपक्ष असल्यामुळे बहुतांश उमेदवार हे २० सप्टेंबरनंतरच उमेदवारी दाखल करतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे शेवटच्या तीन दिवसांच्या कालावधीत अर्ज भरण्यासाठी नेट कॅफेवर गर्दीच होणार आहे.
त्या कालावधीतही लुटीची मोठी संधी मिळणार आहे. याबाबत प्रभाग क्र. १५ मधील दिनेश शेषराव बोडके, लक्ष्मी वामनराव टोम्पे या दोन इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीत असलेल्या एका नेटकॅफेवर अर्ज भरण्यासाठी त्यांना पाच हजार रुपये भाव असल्याचे सांगितले. या दोन्ही उमेदवारांनी मनपा निवडणूक विभागाकडे तक्रार केली आहे.
या तक्रारीची दखल घेऊन तरी आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठरावीक रक्कम आकारण्याच्या सूचना देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.