आश्रमावरील दरोडा ; ९ संशयितांना अटक
By | Updated: November 28, 2020 04:11 IST2020-11-28T04:11:46+5:302020-11-28T04:11:46+5:30
औरंगाबाद : चौका डोंगरामागील राधा गोविंद आश्रमात ११ नोव्हेंबरच्या रात्री महाराज आणि त्यांच्या साधकांना झालेली मारहाण दरोड्याच्या उद्देशाने ...

आश्रमावरील दरोडा ; ९ संशयितांना अटक
औरंगाबाद : चौका डोंगरामागील राधा गोविंद आश्रमात ११ नोव्हेंबरच्या रात्री महाराज आणि त्यांच्या साधकांना झालेली मारहाण दरोड्याच्या उद्देशाने झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी ९ संशयित दरोडेखोरांना अटक केली असून, गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या दोन कार, चाकू आणि ७ मोबाईल पोलिसांनी जप्त केले.
बाळू बापू चव्हाण, बलवान चैनसिंग पवार, भीमसिंग चेंजिंग पवार, कुलदीप डहाणसिंग ऊर्फ रुमालसिंग पारधी, राजेश ऊर्फ भालकर विठ्ठल सोळंकी, हेमराज करणसिंग सोलंकी, रामप्रसाद गणपत चव्हाण, कृष्णा ऊर्फ बाळू दहिवाळ आणि राधेश्याम ऊर्फ राजा रामराव भावले, अशी आरोपींची नावे आहेत. ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे त्यांनी सांगितले की, ११ नोव्हेंबर रोजी रात्री २.१५ वाजेच्या सुमारास आश्रमात अनोळखी दरोडेखोरांनी धुडगूस घालून तेथील शरणजित महाराज ऊर्फ यादवचंद्र राधाकृष्ण पाराशर (६१) यांना आणि त्यांच्या साधकांना बेदम मारहाण केली होती. यावेळी महाराजांनी जोरदार प्रतिकार केला, तसेच त्यांच्या साधकांनी आरडाओरड केल्याने दरोडेखोर पसार झाले होते. या घटनेचा फुलंब्री पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा तपास करीत होते. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी दोन कार वापरल्या होत्या. या कार चौका येथील देशी दारू दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. शिवाय आरोपींनी घटनास्थळावरून त्यांच्या साथीदाराला कॉल केला होता. या तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संशयित रामप्रसाद चव्हाण आणि कृष्णा ऊर्फ बाळू दहिवाळ यांना ताब्यात घेतले होते. चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली देताना आरोपी राधेश्याम चिखलेचा मित्र करण सोळंकीने महाराजांकडे खूप पैसा असल्याची माहिती दिली. यानंतर करण याने तरोडा येथील त्याचे नातेवाईक आणि अन्य साथीदारांना घेऊन हा गुन्हा केल्याचे सांगितले. पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली.
पोलीस म्हणतात...
दरोडेखोरांवर ६१ वर्षीय महाराज पडले भारी
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ६१ वर्षे वयाच्या महाराजांवर अट्टल दरोडेखोरांनी हल्ला केला तेव्हा महाराज एकटेच आणि बेसावध होते. तयारीनिशी असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांना बेसावध महाराज भारी ठरले. यामुळे दरोडेखोर घाबरून आश्रमातून एक रुपयाही न घेऊन जाता पळून गेले.