कपडे विक्रेत्याला रामनगरात भरदिवसा लुटले
By Admin | Updated: September 21, 2014 00:41 IST2014-09-21T00:13:11+5:302014-09-21T00:41:51+5:30
औरंगाबाद : दारोदार फिरून कपडे विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याला दोन तरुणांनी मारहाण करीत लुटल्याची घटना काल दुपारी रामनगर परिसरात घडली.

कपडे विक्रेत्याला रामनगरात भरदिवसा लुटले
औरंगाबाद : दारोदार फिरून कपडे विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याला दोन तरुणांनी मारहाण करीत लुटल्याची घटना काल दुपारी रामनगर परिसरात घडली. लुटमारी करणाऱ्या दोघांपैकी शरद मारुती पवार (२७, रा. रामनगर, मुकुंदवाडी) या एका आरोपीला नागरिकांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
उत्तर प्रदेशातील मेरठ येथील जावेद युसूफ रिझवी (२१) हा युवक गल्लोगल्ली फिरून कपडे विक्री करण्याचा व्यवसाय करतो. कपडे विक्रीसाठी तो गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत आलेला होता. काल दुपारी तो रामनगर परिसरात फिरत असताना आरोपी शरद पवार व त्याच्या साथीदाराने जावेदला थांबविले. आम्हाला कपडे दाखव, असे दोन्ही आरोपी म्हणाले. जावेदने त्यांना कपडे दाखविण्यास सुरुवात केली. अचानक आरोपी शरदने जावेदच्या हातातील सर्व कपडे हिसकावून घेतले आणि ‘चल खिशात किती पैसे आहेत दाखव’ असे म्हणत त्याच्या खिशातील दीड हजार रुपयेही हिसकावून घेतले आणि पळ काढला. तेव्हा जावेदने आरडाओरड सुरू केली. हे पाहून आसपासचे नागरिक धावत आले. नागरिकांनी पाठलाग करून दोनपैकी शरद पवार या आरोपीला पकडले. त्याला चोप दिला आणि नंतर मुकुंदवाडी पोलिसांना बोलावून या आरोपीला त्यांच्या स्वाधीन केले. आरोपींविरुद्ध वाटमारीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.