शहरातील रस्ते अंधारातच; प्रशासन निद्रिस्त
By Admin | Updated: October 30, 2014 00:30 IST2014-10-30T00:16:40+5:302014-10-30T00:30:43+5:30
औरंगाबाद :अंतर्गत राजकारण आणि ११२ कोटी रुपयांच्या पथदिव्यांच्या निविदेवर कोर्टाने ओढलेले ताशेरे. यामुळे शहरातील सर्व मुख्य रस्ते अंधारात गेले

शहरातील रस्ते अंधारातच; प्रशासन निद्रिस्त
औरंगाबाद : महापालिका प्रशासनाची बेफिकिरी, सत्ताधारी शिवसेना- भाजपा पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारण आणि ११२ कोटी रुपयांच्या पथदिव्यांच्या निविदेवर कोर्टाने ओढलेले ताशेरे. यामुळे शहरातील सर्व मुख्य रस्ते अंधारात गेले आहेत.
प्रशासनातील जबाबदार अधिकारी पदाधिकाऱ्यांना जुमानत नाहीत. पथदिव्यांचे काम पाहणारी विनवॉक ही कंपनी पालिका प्रशासनाला दाद देत नाही, तर वॉर्डातील अंतर्गत पथदिव्यांचे काम करणारे कंत्राटदारही हताश झालेले आहेत. अशा सगळ्या कचाट्यात पथदिव्यांचा प्रकाश अडकला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवाळीतही बंद होते. ते अजून सुरू झालेले नाहीत. दिवाळीच्या सणात रस्ते अंधारातच होते. तरीही पथदिव्यांकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे. पथदिव्यांसाठी ११२ कोटी रुपयांतून बीओटीवर मनपाने कंत्राट दिले होते. त्या कंत्राटात अनेक त्रुटी असल्यामुळे कोर्टाने त्यावर ताशेरे ओढले आहेत.
११२ कोटी रुपयांचे कंत्राट इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम्स प्रा.लि. आणि पॅरागॉन केबल इंडिया या संस्थेला दिले होती. त्या कंपनीने आता सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जुन्या विनवॉक कंपनीकडून सर्व पथदिवे सुरू करून घेतल्यानंतरच वरील कंपनी काम सुरू करील. ११ नोव्हेंबरपर्यंत विनवॉक कंपनीला मुदत दिली आहे. मात्र, ती कंपनीही काम करीत नाही. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बंद पथदिव्यांकडे कुणाचेही लक्ष नाही. पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात होते, तर अधिकारी निवडणुकीच्या कामात होते.
जालना रोड, एन-५, बजरंग चौक ते बळीराम पाटील चौक, औरंगपुरा ते बाराभाई ताजिया, शहागंज ते सिटीचौक, टिळकपथ ते गुलमंडी, निराला बाजार ते जि.प. मैदानापर्यंत या मुख्य रस्त्यांवरील अनेक पथदिवे बंद आहेत, तसेच पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर ते शिवाजी चौक, एन-११, एन-१२, सिडकोतील रस्त्यांवर पथदिवे बंद आहेत.