तलाव कामाच्या मागणीसाठी तुपेवाडी पाटीवर रास्तारोको
By Admin | Updated: July 24, 2015 00:44 IST2015-07-24T00:22:23+5:302015-07-24T00:44:16+5:30
राजूर : गेल्या तीन वर्षांपासून तुपेवाडी (ता.बदनापूर) येथील बंद असलेले साठवण तलावाचे काम सुरू करण्यात येऊन दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी,

तलाव कामाच्या मागणीसाठी तुपेवाडी पाटीवर रास्तारोको
राजूर : गेल्या तीन वर्षांपासून तुपेवाडी (ता.बदनापूर) येथील बंद असलेले साठवण तलावाचे काम सुरू करण्यात येऊन दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी तुपेवाडी पाटीवर गुरुवारी रास्तारोको करण्यात आला. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
तुपेवाडी शिवारात सन २०१० मधे लघुसिंंचन विभागामार्फत साठवण तलावाचे काम सुरू करण्यात आले होते. काम सध्या अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून तलावात पाण्याचे सिंचन होऊ शकले नाही. पर्यायाने आसपासच्या शेतकऱ्यासंह ग्रामस्थांचे पाण्याविना हाल सुरू आहे. करण्यात आलेले काम दर्जाहिन असून अंदाजपत्रकानूसार करण्यात आलेले नाही. याविषयी बंजारा टायगर्सचे रतनकुमार नाईक यांनी अनेकवेळा संबधित अधिकाऱ्यांना निवेदन देवून काम सुरू करण्याची मागणी केली. मात्र याकडे संबधितांनी दुर्लक्ष केल्याने
आज रतनकुमार नाईक, सरपंच एकनाथ मोरे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात
आले. यामुळे सुमारे अर्धातास रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.
यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. यावेळी रतनकुमार नाईक, एकनाथ मोरे यांनी आपल्या भाषणातून तलावाचे काम तात्काळ सुरू करण्यासह दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांच्या संपादीत जमीनीचा उर्वरित मावेजा तात्काळ देण्यात यावा , अशी मागणी केली.
यावेळी रंगनाथ मगर, मधूकर राठोड, तुकाराम चव्हाण, विष्णू काफरे, भास्कर काफरे, अर्जुन मोरे, मोहन राठोड, तुळशिराम राठोड, कृष्णा गायकवाड, रमेश चव्हाण, विठ्ठल डोळस, रामलाल कुमकर यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी चंदनझिरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)
लघुसिंंचन खात्याचे उपविभागीय अभियंता एम.एन.चापते यांनी तलावाच्या कामाचे सुधारित अंदाजपत्रक शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून, प्रशासकीय मान्यतेनंतर तात्काळ काम सुरू करण्यात येईल. सिमेंट नाला बांधचे काम एक महिन्याच्या आत सुरू करण्यात येईल. कंत्राटदाराने हयगय केल्यास कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.