रस्त्यांचा श्वास गुदमरतोय
By Admin | Updated: July 7, 2014 00:43 IST2014-07-07T00:37:53+5:302014-07-07T00:43:53+5:30
औरंगाबाद : शहरातील कोणत्याही मुख्य रस्त्यांवरून वाहन चालविणे तारेवरची कसरत बनली आहे.

रस्त्यांचा श्वास गुदमरतोय
औरंगाबाद : शहरातील कोणत्याही मुख्य रस्त्यांवरून वाहन चालविणे तारेवरची कसरत बनली आहे. पार्किंगअभावी रस्त्यावरच उभी राहणारी वाहने, रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे, यामुळे शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांचा जीव गुदमरतोय. परिणामी कोणत्याही वाहनांनी जाण्यासाठी जेथे दहा मिनिटे लागतात, तेथे ही अडथळ्यांची शर्यत पार करण्यास वीस- पंचवीस मिनिटे लागतात.
आशिया खंडातील सर्वाधिक झपाट्याने वाढणारे शहर, अशी औरंगाबादची ओळख आहे. गेल्या दशकापासून शहराची लोकसंख्या आणि विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आपले शहर आता मेट्रोसिटीकडे वाटचाल करीत आहे.
एकीकडे शहर दिवसेंदिवस वाढत असतानाच दुसरीकडे आधीच अरुंद रस्ते आणि त्यातच रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा वेग मंदावत चालला आहे. सततच्या ट्राफिक जाममुळे शहरवासीय त्रस्त आहेत.
मनपा, पोलीस प्रशासनाने याला वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात वाहतुकीच्या बाबतीत सर्वात त्रासदायक शहर, अशी औरंगाबादची ओळख बनू शकते.
‘नो पार्किंग’ मोठी समस्या
1कोणतीही इमारत बनविताना पार्किंगसाठी जागा सोडावीच लागते. मात्र, शहरातील जवळपास ९० टक्के व्यापारी संकुले, मुख्य रस्ते आणि बाजारपेठेतील दुकानदारांनी पार्किंगच्या जागाच गिळंकृत केल्या आहेत.
2पार्किंगच्या जागेवर घरे, दुकाने बांधल्यामुळे जागेअभावी वाहने रस्त्यावर ‘नो पार्किंग’मध्येच पार्क केली जातात. परिणामी वाहतुकीला अथडळा निर्माण होत आहे.
3ही अवस्था वाहतुकीची ‘लाईफलाईन’ समजल्या जाणाऱ्या जालना रोडसह शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांची आहे. वास्तविक पाहता काही वर्षांपूर्वी न्यायालयाने ही समस्या लक्षात घेऊन ज्यांनी पार्किंगसाठी जागा सोडलेली नाही, अशा व्यापारी संकुल, इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले होते.
4न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाने थातुरमातुर कारवाई केली. पुढे ही कारवाई बारगळली आणि परिस्थिती ‘जैसे थे’ राहण्याऐवजी अधिकच गंभीर बनली.
अॅपे, आॅटोमुळे वाहतुकीचा खोळंबा
आधीच रस्त्यांवर, चौकाचौकांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. त्यातच आॅटोरिक्षा, अॅपेरिक्षा, काळी-पिवळीचालक हे वाहतुकीच्या खोळंब्यात अधिक भर घालताना दिसून येतात. प्रवासी उचलण्यासाठी ही मंडळी चौकातच वाहने उभी करतात. विशेष म्हणजे या चौकांमध्ये उभे असलेले पोलीस त्यांच्याकडे कानाडोळा करताना दिसतात.
मनपा, पोलिसांचे दुर्लक्ष
वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे. तर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. मात्र, या दोन्ही यंत्रणा आपापल्या जबाबदारीकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. रिक्षावाले पोलिसांच्या डोळ्यादेखत रस्त्यांवर, चौकाचौकांत थांबून प्रवासी बसवितात. त्यामुळे वाहतूक खोळंबते; परंतु पोलीस त्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करतात. शिवाय ‘नो पार्किंग’मध्ये उभा राहणाऱ्या वाहनांविरुद्ध वाहतूक पोलीस अमावास्या- पौर्णिमेला कारवाई करताना दिसतात. अतिक्रमण आणि फेरीवाल्यांवर तर मनपा पाच, सहा महिन्यांमधून एखाद्या वेळी जुजबी कारवाई करताना दिसते.
चिश्तिया कॉलनी ते बळीराम पाटील चौक
सिडको एन-६, चिश्तिया कॉलनी चौक ते एन-८ परिसरातील बळीराम पाटील महाविद्यालय चौकापर्यंतचा असलेला सरळ रस्ता हा मुख्य रस्ता आहे. पूर्वी या रस्त्यावर सकाळी व सायंकाळी नागरिकांना मोकळे चालता येत होते; पण आता दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग, हातगाडीवाले यांनीच रस्ता व्यापल्याने त्यावरून पायी चालणे कठीण झाले आहे. विशेषत: चिश्तिया चौक, आविष्कार चौक, बळीराम पाटील चौकात सकाळी ८.३० ते ११ वाजेदरम्यान तसेच सायंकाळी ५ वाजेपासून ९ वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाने ५ ते १० मिनिटे वाहतूक जाम होत असते. त्यातही कामगारांना कंपन्यांत ने-आण करणाऱ्या गाड्या या रस्त्यावरून जाऊ लागल्या, तर त्यांच्या पाठीमागे वाहनांची मोठी रांग लागते. कारण, तिला ओव्हरटेक करून जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूला जागाच उरत नाही. या संपूर्ण रस्त्याच्या कडेने दोन्ही बाजूंनी सर्रासपणे चारचाकी वाहने पार्क करण्यात येतात. यामुळे रस्ता अरुंद होऊन जातो. त्यात चौकात, रस्त्याच्या मध्ये कुठेही हातगाड्या उभ्या करून विक्रेते फळ, भाजीपाला विकत असल्याने त्यांचाही वाहतुकीला अडथळा होतो. चिश्तिया चौकातील बीअर बार, हॉटेलसमोर अनेक दुचाकी, चारचाकी वाहने आडवी-तिडवी लावली जातात. अशीच स्थिती आविष्कार कॉलनी चौकात व बजरंग चौक, एन-७ कडे जाणाऱ्या चौकातही पाहावयास मिळते.
टीव्ही सेंटर चौक ते जाधववाडी चौक
४हडकोतील गुलमंडी म्हणून जिचा उल्लेख केला जातो, असा टीव्ही सेंटर चौक सदा गजबजलेला भाग, या ठिकाणापासून जाधववाडी चौकापर्यंतच्या रस्त्यावरून पायी चालताना पादचाऱ्यांच्या अंगावर काटे येतात. कारण, दुकानांसमोर अस्ताव्यस्त पार्किंग केलेली वाहने, त्यासमोर हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे रस्त्याची बोळच होते. यामुळे उभ्या वाहनांमधून नागमोडी वाट काढीतच पायी जावे लागते. या रस्त्यावरून फेरफटका मारला, तर येथे वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. बळीराम पाटील महाविद्यालयाकडे वळणाऱ्या रस्त्यापासून ते शरद हॉटलपर्यंतच्या रस्त्यावरच भाजीपाला, फळवाले हातगाड्या घेऊन उभे राहतात, वाहने पार्क केलेली असल्यामुळे वाहतूक जाम होते.
उस्मानपुरा सर्कल ते पीरबाजार
उस्मानपुरा सर्कल ते पीरबाजार रस्ता हा वर्दळीचा बनला आहे. मात्र, अतिक्रमण मोहीम येथे पोहोचली नसल्याने हा रस्ता अरुंदच आहे. त्यात दुकानांसमोर उभी राहणारी वाहने व सततची वर्दळ यामुळे येथे अनेकदा चार ते पाच मिनिटांच्या प्रवासासाठी १५ ते २० मिनिटे लागतात.
पंचवटी चौक ते रेल्वेस्टेशन चौक
महावीर चौक ते पंचवटी चौकादरम्यान हातगाड्या व त्यासमोर रिक्षा उभ्या राहत असल्याने येथेही वाहतूक जाम होत असते. प्रवासी आपल्याच रिक्षात बसावा याकरिता रिक्षाचालकांची धडपड सुरू असते, अशा वेळी रस्त्यावर एकाच ओळीत तीन ते चार रिक्षा उभ्या राहतात व रस्ता जाम होऊन जातो. उल्लेखनीय म्हणजे चौकात वाहतूक पोलीस असतात; पण त्यांचे सर्व लक्ष सिग्नल तोडणाऱ्यांवर असते. पंचवटी चौकापासून ते रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्येच अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे हा रस्ता अरुंद आहे. येथून एका वेळी एकच ट्रक, टेम्पो जाऊ शकतो. अशा वेळी पाठीमागे वाहनांची मोठी रांग लागते. आरटीओ आॅफिससमोरही मोठ्या संख्येने वाहने उभी असतात.
हेडगेवार रुग्णालय ते आकाशवाणी चौक
हेडगेवार रुग्णालयाच्या आसपासही हातगाडी, टपरीवाल्यांचे अतिक्रमण तसेच वाहनांची रस्त्यावरच पार्किंग यामुळे येथे सतत वाहतुकीचा खोळंबा होत असतो. त्रिमूर्ती चौकाची रचनाच विचित्र आहे. यामुळे वाहनधारक वळताना येथे किरकोळ अपघात घडत असतात. याशिवाय या चौकापासून ते आकाशवाणीपर्यंतच्या चौकापर्यंत दोन्ही बाजंूनी रस्त्यावरच दुचाकी, चारचाकी गाड्या पार्क केल्या जात असल्याने हा रस्ताही अरुंद होतो. यामुळे गर्दी वाढते.
जयभवानी चौक ते गजानन महाराज मंदिर चौक
जयभवानी चौकात आडव्या-तिडव्या लावलेल्या रिक्षा उभ्या असतात तसेच या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या हातगाडीवाल्यांची संख्याही कमी नाही. पुंडलिकनगर येथील पाण्याच्या टाकीसमोरील बाजूस विटांनी भरलेल्या टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टरची भलीमोठी रांग असते. यामुळे रस्ता अरुंद होतो. पुंडलिकनगरपासून पुढे वडापाववाले, पाणीपुरीवाले, भाजी, फळ व अन्य साहित्य विक्रेतेही रस्ता अडवितात. शहरात सर्वांत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण कुठे असेल तर याच गजानन महाराज मंदिर चौकात. सकाळी व सायंकाळी या भागाला भाजीमंडईचे स्वरूप येते. त्यामुळे अडथळे पार करतच मार्गक्रमण करावे लागते.
वोखार्ड चौक ते आंबेडकरनगर चौक
वोखार्ड कंपनी परिसरातील चौकातही वाहतूक पोलीस नसल्याने येथे वाहतुकीला शिस्तच नसते. रिक्षाचालक कशाही पद्धतीने रस्त्यावर रिक्षा उभ्या करत प्रवाशांची वाट पाहत असतात. अनेकदा पादचाऱ्यांच्या समोरच आणून रिक्षा आडवी उभी केली जाते. यामुळे पाठीमागून दुचाकीधारकाला अचानक ब्रेक लावावा लागतो किंवा गाडी स्लीप होण्याचे प्रकार येथे नेहमी घडत असतात. विशेषत: कंपनीच्या शिफ्ट बदलण्याचा वेळी कामगारांची या चौकात मोठी गर्दी होते. त्यावेळी तिन्ही बाजंूनी वाहतूक जाम होत असते. तसेच देवगिरी बँकेकडून वोखार्ड कंपनीकडे जाताना दुरून फेरा मारावा लागतो. लोक शॉर्टकट मारतात. यामुळे नेहमीच या चौकात किरकोळ अपघात घडतात. तसेच आंबेडकरनगर चौकातही तिन्ही बाजंूनी रस्त्यात रिक्षा उभ्या केल्या जातात. येथे ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पोची वर्दळ असल्याने तसेच चौकात सिग्नल नसल्याने सतत वाहतूक जाम होते. याशिवाय पुढे जाधववाडी चौकात अंडा आॅम्लेटच्या गाड्या मोठ्या प्रमाणात लागतात. येथे सिग्नल आहे; पण वाहतूक पोलीस नसल्याने कोणी सिग्नलचे नियम पाळत नाही. समोरासमोर वाहने आल्याने वाहतूक जाम होते.
वसंतराव नाईक चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन
वसंतराव नाईक चौकातून मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे जाण्यासाठी निघाल्यावर समोरील बाजूलाच रिक्षावाल्यांनी रस्त्याच्या मध्यभागापर्यंत अतिक्रमण केलेले असते. रस्त्यावर थोडी जागा मिळते. त्यातून अन्य वाहने पुढे जात असतात. पादचाऱ्यांना दोन्ही रिक्षांमधून वाट काढीत पुढे जावे लागते. याच चौकात फळ विक्रेतेही हातगाड्या घेऊन उभे असतात. अशीच परिस्थिती कामगार चौक, जयभवानी चौकातही दिसून येते. सायंकाळी तर या सर्व चौकांत पायी चालणे अवघड होऊन बसते, एवढे वाहनांचे अतिक्रमण रस्त्यावर झालेले असते. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनच्या पायऱ्यांना खेटूनच २५ ते ३० रिक्षा उभ्या असतात. येथे दुचाकी नेणे सोडाच; पण रेल्वेस्टेशनवर पायी येणे- जाणेही कठीण होऊन बसते.