बांधकाम साहित्यांनी रस्ते अडले
By Admin | Updated: January 24, 2017 22:36 IST2017-01-24T22:35:26+5:302017-01-24T22:36:43+5:30
लातूर :शहरात आता मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन होत असून अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी वाळू, खडी, सळई, विटा आदींचे ढिग बांधकामधारकांनी टाकले आहेत.

बांधकाम साहित्यांनी रस्ते अडले
लातूर : मागील उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे बांधकामांना स्थगिती होती. मात्र शहरात आता मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन होत असून अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी वाळू, खडी, सळई, विटा आदींचे ढिग बांधकामधारकांनी टाकले आहेत. रस्तेच अडल्याने रहदारीला अडथळा होत आहे.
शहरातील प्रकाशनगर, बोधेनगर, कोकाटेनगर, विकासनगर, देशी केंद्र शाळा परिसर, राजस्थान शाळेच्या पाठीमागील भाग, विवेकानंद रुग्णालय परिसर, मंत्रीनगर परिसर, विकासनगर, आवंतीनगर, औसा रोडवरील कालिकादेवी मंदिर परिसर, पद्मानगर, विक्रमनगर, विशालनगर, शिवनगर परिसर, सीतारामनगर, कपिलनगर, वैभवनगर आदी भागांत मोठ्या प्रमाणात घरांचे बांधकाम सुरू आहे. बांधकामधारकांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच ढिग करून लावले आहेत. त्यामुळे या परिसरातील बहुतांश रस्ते अडविल्याचे दिसत आहे. या अंतर्गत रस्त्यांवरून चारचाकी तर सोडा, दुचाकीवरून जाणेही शक्य नाही. बांधकामधारकांनी आपले साहित्य ठेवण्यासाठी रस्त्याचा कोपरा किंवा स्वतंत्र जागा उपलब्ध न करता रस्त्यांवर टाकल्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. कुठे १५ ते २० फुटांचे तर कुठे १० फुटांचेच अंतर्गत रस्ते आहेत. त्या रस्त्यांवर वाळू, खडी, विटा, सळई ठेवल्यामुळे काही ठिकाणी तर रस्ते पूर्णत: बंद झाले आहेत. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बांधकाम परवाने देताना मनपा प्रशासनाने बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी काय सोय केली, या बाबी तपासणे आवश्यक आहे. मात्र मनपाकडून परवाना देताना या बाबींची तपासणी होत नाही.
लातूर शहरातील गावभागात तसेच पूर्व व पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे. बांधकामधारकांनी आपले बांधकाम साहित्य रस्त्यावरच टाकल्यामुळे अनेक ठिकाणी रहदारीला अडथळा होत आहे. काही रस्त्यांवर तर वाहने गेल्यास काढण्यासाठी कसरत करावी लागते.