गाव हद्दीच्या वादात रखडला रस्ता
By Admin | Updated: December 11, 2014 00:43 IST2014-12-11T00:02:10+5:302014-12-11T00:43:19+5:30
नितीन कांबळे , कडा पाटोदा- आष्टी तालुक्याच्या सरहद्दीवर असणारे गहिनीनाथ गडाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सरहद्दीच्या वादावरून गेल्या पंधरा वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे

गाव हद्दीच्या वादात रखडला रस्ता
नितीन कांबळे , कडा
पाटोदा- आष्टी तालुक्याच्या सरहद्दीवर असणारे गहिनीनाथ गडाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सरहद्दीच्या वादावरून गेल्या पंधरा वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे कच्च्या रस्त्यावरूनच नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गहिनीनाथ गडाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा मार्ग खडतर बनत आहे. येथील हातोळा, कुसळं, बीडसांगवी या तिन्ही ठिकाणच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे दर्शनाच्या आधी नागरिकांना खड्डेवारी करावी लागत असल्याने पुण्यतिथी सोहळ्याच्या तोंडावर तरी रस्ता दुरूस्तीचे काम करावे अशी मागणी भाविकांतून होत आहे.
येथील मार्गावरील गेल्या पंधरा वर्षांपासून दिशादर्शक फलक, संरक्षण कठडे नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गडावर जाण्यासाठी रस्त्यांवर जीवघेणी वळणे, अवघड घाट आणि खराब रस्ता असल्याने भाविकांना जीव मुठीत धरूनच गडावर जावे लागत आहे. या गडाला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळाला आहे. मात्र रस्त्याची दयनीय अवस्था पाहता भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पुण्यतिथी सोहळ्यापूर्वी रस्ता दुरूस्ती न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा युवराज पाटील वायभसे यांनी दिला आहे.
स्वखर्चातूनच तयार केला
कच्चा रस्ता
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाला वैतागून व वर्षानुवर्षे भाविकांची होणारी तारांबळ पाहून मठाधिपती विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. या करीता ग्रामस्थांनीही मदतीचा हात दिला.
गहिनीनाथ गड येथील रस्त्याबाबत आष्टी, पाटोदा सा.बां. विभागाचे अधिकारी सुंदर पाटील व सय्यद जिलानी यांना विचारणा केली असता दोघांनीही हा रस्ता आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे रस्ता नेमका कोणाच्या हद्दीत हा प्रश्न अनुत्तरीत आहे.