वीस वर्षांपासून अडलेला रस्ता मार्गी
By Admin | Updated: August 12, 2014 02:02 IST2014-08-12T01:45:49+5:302014-08-12T02:02:17+5:30
औरंगाबाद : सुमारे वीस वर्षांपासून मागणी होत असलेला दौलताबाद रस्त्यावरील शरणापूर फाटा ते वाळूज परिसरातील शहाजापूर या भागाला जोडणारा पाच किलोमीटरचा रस्ता मार्गी लागला

वीस वर्षांपासून अडलेला रस्ता मार्गी
औरंगाबाद : सुमारे वीस वर्षांपासून मागणी होत असलेला दौलताबाद रस्त्यावरील शरणापूर फाटा ते वाळूज परिसरातील शहाजापूर या भागाला जोडणारा पाच किलोमीटरचा रस्ता मार्गी लागला असून, हा रस्ता वर्षभरात पूर्ण होणार आहे.
औरंगाबाद शहरात येणाऱ्या वाहनांची वर्दळ कमी व्हावी व शहराच्या वाहतुकीवरील ताण कमी व्हावा, या हेतूने शहराच्या बाहेरून वाहतूक व्हावी असे प्रयत्न आहेत. शरणापूर फाटा ते औरंगाबाद - मुंबई एक्स्प्रेस रोडला शहाजापूर येथे जोडणाऱ्या रस्त्याची मागील वीस वर्षांपासून वाहतूकदार संघटनेची मागणी होती. हा रस्ता एकेरी असून याठिकाणाहून वेगाने वाहतूक होऊ शकत नाही. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून तो पूर्ण न झाल्याने कन्नड, धुळे या भागातून अहमदनगर किंवा वाळूज औद्योगिक वसाहतीत जाणारी वाहतूक ही नगरनाका येथून जाते. त्यामुळे पडेगाव रस्त्यावर व नगरनाका ते वाळूज या रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. याचा परिणाम म्हणून छोटे मोठे अपघातही घडतात.
शरणापूर फाट्यापासून करोडीमार्गे शहाजापूर या गावाचे अंतर केवळ पाच किलोमीटर इतकेच आहे. हा रस्ता शहाजापूरजवळ औरंगाबाद- मुंबई एक्स्प्रेस रोडला मिळतो. कन्नडवरून येणारे ट्रक तसेच वेरूळ, दौलताबाद, खुलताबाद या ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांसाठी शिर्डी, कोपरगाव आदी भागांकडे जाण्यासाठीदेखील हा रस्ता उपयुक्त आहे. मात्र, हा एकेरी रस्ता असल्याने वाहने औरंगाबाद शहराच्या दिशेने येतात. केवळ पाच किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाल्यास वाहनधारकांची मोठी सोय होणार असल्याचे औरंगाबाद मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान यांनी सांगितले. औरंगाबाद महापालिकेत जकात लागू असताना कन्नड, खुलताबादकडून येणारी अनेक वाहने जकात चुकविण्याच्या हेतूने किंवा वाहतूक कर चुकविण्याच्या हेतूने शरणापूरपासून करोडीमार्गे जात असत. सद्य:स्थितीला पावसाळ्यामुळे या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहने जाऊही शकत नाहीत, अशी अवस्था आहे.