रितेशचा अॅक्शन चित्रपट ‘लय भारी’ ११ पासून
By Admin | Updated: July 8, 2014 01:05 IST2014-07-08T00:43:59+5:302014-07-08T01:05:26+5:30
औरंगाबाद : हिंदी चित्रपटांतून अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळविलेला रितेश देशमुख याची मुख्य भूमिका असलेला पहिला मराठी अॅक्शन चित्रपट ‘लय भारी’ ११ जुलै रोजी येत आहे.

रितेशचा अॅक्शन चित्रपट ‘लय भारी’ ११ पासून
औरंगाबाद : हिंदी चित्रपटांतून अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळविलेला रितेश देशमुख याची मुख्य भूमिका असलेला पहिला मराठी अॅक्शन चित्रपट ‘लय भारी’ महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला ११ जुलै रोजी येत आहे.
रितेश देशमुख याने यापूर्वी २ मराठी चित्रपटांची निर्मितीही केली आहे. ‘मुंबई मेरी जान’, ‘डोंबिवली फास्ट’ आणि ‘फोर्स’ या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे निशिकांत कामत यांनी रितेश देशमुख याच्या या पहिल्या मराठी बिग बजेट चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
रितेश देशमुख याने सोमवारी प्रोझोन मॉलमध्ये पत्रकार परिषदेत ‘लय भारी’ची वैशिष्ट्ये सांगितली. तो म्हणाला की, आई आणि मुलाच्या नातेसंबंधावर आधारित असा हा चित्रपट असून त्यात सस्पेन्स, थ्रिल, रोमान्स, ट्रॅजिडी असे रंग आहेत. मला मराठी असल्याचा अभिमान आहे, असे सांगून रितेश देशमुख म्हणाला की, बिग बजेटच्या या ‘लय भारी’च्या प्रमोशनद्वारे मराठी चित्रपटसृष्टीचे नेटवर्क वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे. मी गेल्या अडीच वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीच्या संपर्कात आहे. ‘लय भारी’त प्रेक्षकांना दर्जेदार अभिनय बघायला मिळेल. या चित्रपटात तन्वी आझमी, राधिका आपटे, उदय टिकेकर, शरद केळकर, संजय खापरे आणि आदिती पोहनकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सलमान खान यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असल्याचे त्याने सांगितले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते साजीद नाडियादवाला यांनी ‘लय भारी’ची कथा लिहिली असून, पटकथा रितेश शहा यांची तर संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. संगीत अजय- अतुल यांचे आहे. गीते गुरू ठाकूर आणि अजय- अतुल यांनी लिहिली आहेत.