सिमेंटचे दर वाढल्याने परवडणाऱ्या घरांचे बजेट बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:18 IST2021-02-05T04:18:18+5:302021-02-05T04:18:18+5:30

औरंगाबाद : पुन्हा एकदा सिमेंट कंपन्यांनी सिमेंटचे भाव गोणीमागे २० ते ३० रुपयांनी वाढविले आहे. यामुळे परवडणाऱ्या घरांचे बजेट ...

Rising cement prices have hurt the budget for affordable housing | सिमेंटचे दर वाढल्याने परवडणाऱ्या घरांचे बजेट बिघडले

सिमेंटचे दर वाढल्याने परवडणाऱ्या घरांचे बजेट बिघडले

औरंगाबाद : पुन्हा एकदा सिमेंट कंपन्यांनी सिमेंटचे भाव गोणीमागे २० ते ३० रुपयांनी वाढविले आहे. यामुळे परवडणाऱ्या घरांचे बजेट कोलमडले आहे. सिमेंटच्या भाववाढीवर सरकारचे कोणतेच नियंत्रण नसल्याने कंपन्या महिन्याला सिमेंटचे भाव ठरवून वाढवत आहेत.

कांदा, बटाट्याचे भाव वाढले की सरकार हस्तक्षेप करते. मग, सिमेंटचे भाव वाढले की, सरकार हस्तक्षेप का करत नाही, असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. ‘घर’सुद्धा मूलभूत गरज आहे. ‘२०२२ पर्यंत सर्वांना घर’ हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. त्यासाठी सिमेंट, स्टीलचे भाव आटोक्यात राहणे गरजेचे आहे. घर खरेदीसाठी सरकार सवलती देत आहे; पण त्यासाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्याच्या किमतीचे काय. कारण, मागील महिन्यांत सिमेंट उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली व १ फेबुवारीपासून सिमेंटच्या भाववाढीची घोषणा केली, तसे वितरकांना कळवले. त्यानुसार नॉनट्रेंडमध्ये ३० रुपयांची वाढ करून २९० ते ३०० रुपये तर ट्रेंडमध्ये २० रुपयांची वाढ करून ३८० ते ३९५ रुपये प्रति गोणी भावाने आता सिमेंट विकले जात आहे.

महाराष्ट्रात दर महिन्याला ३० लाख टन सिमेंट विक्री होते. यात ५५ टक्के ट्रेंडमध्ये तर ४५ टक्के नॉनट्रेंडमध्ये विकले जाते.

सिमेंटवर २८ टक्के जीएसटी लागतो, सध्या ३९५ रुपये गोणी मिळते, त्यात जीएसटी १८ टक्के म्हणजे ११० रुपये समावेश आहे. जीएसटी १० टक्क्याने कमी करून १८ टक्क्यांवर आणला तर ७१ रुपये जीएसटी आकारला जाईल. १० टक्क्याने सिमेंटचे भाव कमी होतील. डिझेलचे भाव मागील १० महिन्यांत लिटरमागे १६ रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे मालवाहतूक भाडे प्रति गोणीमागे १५ रुपये वाढून ७५ ते ८० रुपये घेतले जात आहे. याचाही परिणाम सिमेंटचे भाव वाढण्यावर होत आहे. यामुळे जे बांधकाम व्यावसायिक परवडणारे घर उभारत आहेत त्यांचे बजेट १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे, अशी माहिती औरंगाबाद सिमेंट वितरक संघटनेचे अध्यक्ष मनोज रुणवाल यांनी दिली.

चौकट

महिना वर्ष २०२० सिमेंट भाव

( प्रति गोणी )

एप्रिल ३१० रुपये

मे ३३० रुपये

जून ३७० रुपये

जुलै ३७० रुपये

ऑगस्ट ३८० रुपये

सप्टेंबर ४०० रुपये

ऑक्टोबर ३७० रुपये

नोव्हेंबर ३९५ रुपये

डिसेंबर ३८५ रुपये

जानेवारी २०२१ ३७५ रुपये

२ फेबुवारी ३९५ रुपये

Web Title: Rising cement prices have hurt the budget for affordable housing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.