दारुबंदीला हरताळ

By Admin | Updated: November 25, 2015 00:20 IST2015-11-25T00:10:22+5:302015-11-25T00:20:47+5:30

लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथील महिलांनी अनेक महिने संघर्ष करून सन २००७ मध्ये गावात दारूबंदीचा ठराव पारित करून घेतला होता़

Rioting of the brawl | दारुबंदीला हरताळ

दारुबंदीला हरताळ


लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथील महिलांनी अनेक महिने संघर्ष करून सन २००७ मध्ये गावात दारूबंदीचा ठराव पारित करून घेतला होता़ मात्र, केवळ अडीच वर्षांच्या कालावधीतच दारूविक्रेत्यांनी महिलांच्या लढ्याला हरताळ फासत पुन्हा तेजीत अवैैध दारूविक्री सुरू केली़ सद्यस्थितीत हिप्परगा रवा परिसरात दारूविक्रीला ऊत आला आहे़ विशेषत: राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांनी अवैध दारूविक्री रोखण्याकडे दुर्लक्ष केले आहे़
बालाजी बिराजदार ल्ल लोहारा
शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर हिप्परगा रवा हे गाव वसलेले आहे़ गावची लोकसंख्या अडीच हजारांच्या आसपास आहे़ हे गाव काही वर्षापूर्वी तुळजापूर होते़ लोहारा तालुका निर्मितीनंतर या गावाचा समावेश लोहाऱ्यात झाला़ मात्र, या गावासाठी पुन्हा अनेक वर्षे नळदुर्ग पोलीस ठाणे होते़ परिणामी अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक राहिला नाही़ त्यानंतर हे गाव लोहारा पोलीस ठाण्याशी जोडण्यात आले़ मात्र, लोहारा पोलिसांच्या दुर्लक्षामुळे येथील अवैैध दारूविक्रीसह अवैैध धंदे सुरूच राहिले़
खुलेआम होणारी अवैैध दारूविक्री, दारुमुळे उध्दवस्त होणारे संसार, व्यसनाधीन होत असलेली युवा पिढी याला कंटाळून गावातील रणरागिणींनी दारूबंदीसाठी एकत्रित यल्गार केला़ महिलांच्या पुढाकारामुळे, आंदोलनामुळे सन २००७ मध्ये गावात दारूबंदी झाली़ दारूबंदीसाठी महिलांनी एकत्रित येवून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यत धाव घेतली होती़ महिलांच्या मोठ्या आंदोलनानंतर गावातील दारूची बाटली अडवी झाली़ त्यानंतर आडीच वर्षे गावातील दारूविक्री बंद होती़ पण कालांतराने राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस प्रशासनाचे अवैैध दारूविक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत गेले़ किंबहुना दारूविक्रेते आणि संबंधित अधिकाऱ्यांचे लागेबांदे झाल्याने दारूविक्री पुन्हा सुरू झाली़
सध्या गावात दोन-तीन ठिकाणी अवैैधरित्या दारूविक्री केली जात आहे़ पोलीस प्रशासनाला, राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही ही बाब माहिती असताना दारूविक्री होतेच कशी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ अवैैध दारूविक्रीमुळे अनेकांचे संसार देशोधडीला जात असून, युवा पिढीही व्यसनाधीन होत आहे़
शिवाय गावातील भांडण-तंट्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे़ महिलांनी मोठा लढा उभारून गावात केलेली दारूबंदी अवैैध धंदेवाल्यांकडून उठविण्यात आली असून, प्रशासनाचेही संबंधितांना सहकार्य लाभत असल्याचा आरोप हिप्परगा येथील ग्रामस्थांतून केला जात आहे़ तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने गावातील दारूबंदी कायम ठेवण्यासाठी जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़
हिप्परगा रवा येथे दारूबंदी झालेली असतानाही गावातीलच गटा-तटाचे राजकारणही खुलेआम दारूविक्री होण्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे़ दारूबंदीनंतर काहींनी अवैध दारूविक्री करणाऱ्यांना सहकार्य केल्याने त्यांचे मनोबल वाढले़ त्यातच पोलीस, राज्य उत्पादन शुल्कचेही दुर्लक्ष झाले़ एका गटाने दारूबंदीसाठी पुढाकार घेतला तर दुसरा गट दारूविक्रेत्याला सहकार्य करीत असल्याचे दिसत आहे़ पोलिसांची कारवाई झालीच तर त्यांच्याही हातावर तुरी देवून विक्रेते फरार होतात़ त्यातच यामुळे ‘हप्ता’ही चांगलाच वाढल्याचे म्हटले जात आहे़ एकूणच गावातील गटा-तटाचे राजकारणही अवैध दारूविक्रेत्यांसाठी लाभदायक असल्याचे चित्र आहे़

Web Title: Rioting of the brawl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.