रिक्षा बंदचा फज्जा
By Admin | Updated: March 22, 2016 01:33 IST2016-03-22T01:04:10+5:302016-03-22T01:33:40+5:30
औरंगाबाद : मीटर सक्तीसह वाहतूक सुरळीत करण्याच्या नावाखाली पोलिसांनी घेतलेल्या विविध निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद रिक्षाचालक-मालक कृती समितीतर्फे सोमवारपासून

रिक्षा बंदचा फज्जा
औरंगाबाद : मीटर सक्तीसह वाहतूक सुरळीत करण्याच्या नावाखाली पोलिसांनी घेतलेल्या विविध निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद रिक्षाचालक-मालक कृती समितीतर्फे सोमवारपासून तीनदिवसीय बंद पुकारण्यात आला; परंतु आधीच मीटर सक्तीमुळे हैराण झालेल्या रिक्षाचालकांनी पहिल्याच दिवशी या बंदला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर प्रवाशांना घेऊन रिक्षा धावताना दिसून आल्या. रिक्षाचालकांच्या भूमिकेमुळे या बंदचा पहिल्या दिवशी फज्जा उडाल्याचे दिसून आले. बंदच्या नावाखाली रिक्षाचालकांनी सर्वसामान्य प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळून लूट केली.
शहरात १५ मार्चपासून आॅटोरिक्षांसाठी ‘मीटर सक्ती’ करण्यात आली. मीटरशिवाय धावणाऱ्या रिक्षांवर पोलीस आणि आरटीओ कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला. परिणामी विनामीटरच्या रिक्षा शहरातून गायब झाल्या अन् सर्वसामान्यांचे हाल सुरू झाले. मीटर सक्तीबरोबरच गणवेश नसणे, तीनपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, उजव्या बाजूला रॉड नसणे, परमिट नसणे आदी बाबींची तपासणी करून पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मीटर सक्ती केल्यामुळे मीटरची दुरुस्ती करण्यासाठी रिक्षाचालकांची सर्व्हिस सेंटरवर गर्दी होत आहे. परंतु आठ-आठ दिवस उलटूनही मीटर दुरुस्त करून मिळत नाही. त्यातच सर्व्हिस सेंटर बंद ठेवून त्यास आणखी विलंब केला जात आहे. यामुळे रिक्षा उभी करावी लागत असून, उपासमारीची वेळ येत असल्याने शेकडो रिक्षाचालक (पान २ वर)
मीटर सक्ती लागू करण्यात आल्यानंतर काही दिवसांपासून अनेक रिक्षाचालक नावाला मीटर टाकून सीटरप्रमाणे प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. अशा वेळी मीटर सक्ती असल्याचे सांगून प्रवाशांकडून जादा पैसे उकळले जात आहेत.
बंदला ७० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या कमी होती. काही रिक्षा रस्त्यांवरून धावत होत्या. त्याचे कारण वेगळे आहे. रिक्षातून चार प्रवासी वाहतुकीची परवानगी मिळाली पाहिजे. मीटर दुरुस्तीला वेळ लागत आहे. त्यामुळे मीटर सक्तीला मुदतवाढ द्यावी.
-कॉ. बुद्धिनाथ बराळ, लाल बावटा रिक्षाचालक- मालक युनियन