छत्रपती संभाजीनगर : हायकोर्ट सिग्नल ते मोंढा नाका या नियमित प्रवासासाठी शेअरिंगमध्ये दहा रुपयांऐवजी शंभर रुपये मागून प्रवासी महिलेसोबत रिक्षाचालकाने उद्धट वागत वाद घातला. त्यानंतर तिला रिक्षामधून खाली ढकलून देत तिच्या पायावरून रिक्षा नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात महिलेच्या पायाला गंभीर इजा झाली असून रिक्षाचालकाचा शोध सुरू असल्याचे जवाहरनगरचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी सांगितले.
शहरातील रिक्षाचालकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या चालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रिक्षाचालकांकडूनच प्रवाशांना लुटल्याच्या घटना सातत्याने घडत असताना एका चालकाने महिलेसोबत आक्षेपार्ह कृत्य करत रिक्षातून ढकलून दिले. शिवशंकर कॉलनीत राहणाऱ्या ३८ वर्षीय तक्रारदार महिला हायकोर्ट परिसरातील एका रुग्णालयात नोकरी करतात. बुधवारी रात्रपाळी करून त्या सकाळी ७ वाजता घरी जाण्यासाठी रिक्षात बसल्या. त्यावेळी आधी दोन महिला बसलेल्या होत्या. त्या आकाशवाणी चौकात उतरून गेल्या. मोंढा नाका सिग्नलजवळ उतरल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे १०० रुपये दिले. मात्र, चालकाने या अंतराचे १० रुपयेच होत असल्याचे सांगत उर्वरित ९० रुपये परत देण्यावरून वाद घातला. महिलेने त्याला त्या रोज दहाच रुपये देत असल्याचे सांगूनही तो अर्वाच्च भाषेत बोलत अरेरावी करत होता. महिलेने त्याला पुन्हा ९० रुपये परत देण्यास सांगितले. त्यावर त्याने थेट महिलेचा हात धरून जोरात खाली ढकलले. यात महिला थेट रस्त्यावर कोसळली.
पायाला गंभीर इजामहिला रस्त्यावर कोसळून जखमी झाल्याने त्यांना लवकर उठता आले नाही. मात्र, मुजोर रिक्षाचालकाने त्यानंतरही रिक्षाचालकाने न थांबता सुसाट वेगात रिक्षा पुढे नेली. यात रिक्षाचे चाक महिलेच्या डाव्या पायावरून गेले. यामुळे तिच्या पायाला गंभीर इजा झाली. रुग्णालयात उपचार घेऊन महिलेने सायंकाळी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकारामुळे घाबरल्याने महिलेला रिक्षाचा क्रमांक पाहता आला नाही. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जवाहरनगर पोलिसांना चालकाचा शोध लावता आलेला नव्हता.
तो दारू पिलेला होताजखमी महिलेच्या माहितीनुसार, रिक्षाचालक अंदाजे २५ वर्षाचा असावा. त्याने एका तरुणीसोबतही वाद घातला. महिलेची पर्स, मोबाइलदेखील रिक्षात राहिली. चालक तो तसाच घेऊन गेला. त्याच्या तोंडाचा नशा केल्याचा वास येत असल्याचे महिलेने लोकमत सोबत बोलताना सांगितले.