जैन धर्माच्या समृध्दतेची साक्ष शिलालेखातून मिळते : सुजाता शास्त्री
By Admin | Updated: December 28, 2014 01:15 IST2014-12-28T01:06:27+5:302014-12-28T01:15:08+5:30
दत्ता थोरे ,लातूर लातूरच्या पुनरुत्थानाचे दस्तऐवजी दाखले जैन शिलालेखात दडले आहेत. किंबहुना मराठीचा पहिला शिलालेख श्रवणबेळगोळच्या रुपाने पहायला मिळतो.

जैन धर्माच्या समृध्दतेची साक्ष शिलालेखातून मिळते : सुजाता शास्त्री
दत्ता थोरे ,लातूर
लातूरच्या पुनरुत्थानाचे दस्तऐवजी दाखले जैन शिलालेखात दडले आहेत. किंबहुना मराठीचा पहिला शिलालेख श्रवणबेळगोळच्या रुपाने पहायला मिळतो. हे शिलालेख मराठी भाषा, जैन धर्म आणि मानवी विकास या साऱ्यांची साक्ष देणाऱ्या आहेत, असे मत सुजाता शास्त्री यांनी मांडले.
लातूर सकळ जैन समाज आणि महाराष्ट्र जैन इतिहास परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या दहाव्या अधिवेशनानिमित्त आल्या असता संमेलनाध्यक्षांच्या भाषणानंतर त्या खास ‘लोकमत’शी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, या इतिहास परिषदेच्या अधिवेशनात मी हीच भूमिका घेऊन आले आहे. आज ‘लातूर’ असले तरी कधी काळी हे लत्तनूर (खटनूर) होते. स्वत: राष्ट्रकूट राजा आपला उल्लेख लत्तनूरचे पुरार्धाम्बर (लॉर्ड आॅफ द सिटी लत्तनूर) असा करीत असे. महामंडलेश्वर रट्ट कालसेन, कर्तवीर्थादी यांच्या प्रशस्त्रीपत्रांमध्येही ‘लत्तनूर -पुरेश्वर’अशा नावाने त्यांनी उल्लेख केला आहे.
लातूरच काय तर जैन धर्माची समृध्द परंपरा पहायची असेल तर आपल्याला शिलालेख हे उत्तम आधार आहेत. मी ज्या जिथे वाढले त्या कर्नाटकसारख्या राज्यात ३६ हजार शिलालेख आहेत.
त्यातील आठहजार शिलालेख हे जैन शिलालेख आहेत. शैवशिलालेख जसे शिवस्तुतीने आणि वैष्णव शिलालेख जसे विष्णुस्तुतीने तसे जैन शिलालेखांचे वैशिष्ट्ये म्हणजे बहुतांश शिलालेखांची सुरुवात ही मंगलस्त्रोत आणि जिनस्तुतीने झाली आहे. ‘भद्रमस्तु जिनशासनाय’, ‘ओं नम: सिध्देभ्य:’, ‘श्री वीतरागाय नम:’, ‘श्री वर्धमानाय नम:’, श्री गोम्मटेशायनम:’ अशा वाक्यांने जैन शिलालेखांची सुरुवात आहे. हे संस्कृतसह कन्नड, मराठी आणि इतर भाषातही आहेत. त्यामुळे जैन धर्म देशभर कसा व्यापला होता याची सहज प्रचिती येते.
‘श्रीूमप्तरम् गंभीरस्याद्वादामोघ लांछन
जीयात् त्रैलोक्यनाथस्य शासनं जिनशासनम्’
हा श्लोक दीड हजाराहून अधिक शिलालेखांवर सुरुवातीला आहे. या शिलालेखांच्या पहिल्यांदा अभ्यासाचे श्रेय डॉ. ए. एन. उपाध्ये यांना द्यावे लागेल.