‘शिक्षण, आरोग्य’साठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 23:05 IST2017-04-16T23:04:02+5:302017-04-16T23:05:18+5:30

बीड : राष्ट्रवादीला धक्का देत महायुतीने जिल्हा परिषदेची सत्ता खेचून आणली; परंतु शिक्षण व आरोग्य खाते कोणाला द्यायचे? यावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

Rice shade for 'education, health' | ‘शिक्षण, आरोग्य’साठी रस्सीखेच

‘शिक्षण, आरोग्य’साठी रस्सीखेच

बीड : राष्ट्रवादीला धक्का देत महायुतीने जिल्हा परिषदेची सत्ता खेचून आणली; परंतु शिक्षण व आरोग्य खाते कोणाला द्यायचे? यावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. सोमवारी जि. प. ची सर्वसाधारण सभा होत असून यात अध्यक्षा विजया गोल्हार सभापतींना खातेवाटप करणार आहेत. विषय समित्यांसाठी सदस्य निवडले जाणार असून स्थायी समितीचीही स्थापना होणार आहे. त्यामुळे या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
६० सदस्यीय जि.प. मध्ये संख्याबळाचे गणित जुळवून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी होमपिचवर झालेल्या दारुण पराभवाची कसर भरुन काढली. महायुतीतील प्रत्येकाला सत्तेची चव चाखण्याची संधीही दिली. मात्र, शिक्षण व आरोग्य खात्यावरुन उपाध्यक्षा जयश्री राजेंद्र मस्के व सभापती राजेसाहेब देशमुख यांच्याच चढाओढ लागली आहे. अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीवेळी समाजकल्याण सभापती म्हणून संतोष हंगे तर महिला बालकल्याण सभापतीपदी शोभा दरेकर यांची वर्णी लागली. अर्थ व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण व आरोग्य या खात्याचे कारभारी निवडीचे अधिकार अध्यक्षांना आहेत. मात्र, या निवडी घोषित होण्यापूर्वीच सभापती युद्धजित पंडित व राजेसाहेब देशमुख यांनी आपल्या दालनाबाहेर समित्यांचा नामोल्लेख करुन नामफलक लावले. पंडित यांना अर्थ व बांधकाम खाते देण्याचा शब्द महायुतीच्या नेत्यांनी दिलेला आहे. उपाध्यक्ष कोणत्याही एका समितीचे पदसिद्ध सभापती असतात. त्यामुळे आता खरी स्पर्धा लागली आहे जयश्री मस्के व राजेसाहेब देशमुख यांच्यात. हे दोघेही शिक्षण व आरोग्य खात्यावर दावा करुन आहेत. मस्के यांनी तत्कालीन शिक्षण व आरोग्य सभापतींचे दालन मिळवून देशमुख यांना शह दिला तर देशमुख यांनीही आपल्या दालनाबाहेर शिक्षण व आरोग्य सभापतीची पाटी लावून त्यांना चोख उत्तर दिले.
दरम्यान, शिवसंग्रामचे चार सदस्य असून राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे आहेत. काँग्रेसकडे तीन सदस्य आहेत; परंतु राजेसाहेब देशमुख यांनी एकट्यानेच भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे संख्याबळाचा निकष लावला तर शिक्षण व आरोग्य खाते आम्हाला मिळाले पाहिजे, असे भांडवल उपाध्यक्षांनी केले आहे. शिवाय आ. विनायक मेटे यांनी पालकमंत्री पंकजा मुुंडेंशी झालेल्या मतभेदानंतरही सत्ता स्थापनेसाठी सर्वांत आधी झाले गेले विसरुन मैत्रीचा हात पुढे केला. मेटे यांनी मस्केंसाठी प्रतष्ठा पणाला लावली आहे. दुसरीकडे राजेसाहेब देशमुख हे रमेश आडसकर यांचे ‘सोयरे’ आहेत. संख्याबळ जुळविताना व खास करुन माजी मंत्री सुरेश धस गटाचे पाच सदस्य भाजपकडे वळविताना त्यांची भूमिका ‘गेमचेंजर’ राहिलेली आहे. देशमुख यांनी पक्षादेश न जुमानता भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे देशमुख यांनाही दुर्लक्षून चालणार नाही. अशा परिस्थितीत पालकमंत्री पंकजा मुंडे कोणाचे नाव सूचवितात ? हे कोडे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rice shade for 'education, health'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.