बक्षीस आणि दंडात्मक कारवाईही...
By Admin | Updated: May 26, 2015 00:51 IST2015-05-26T00:33:24+5:302015-05-26T00:51:22+5:30
औरंगाबाद : पोलिसांचे कर्तव्य उत्कृष्टपणे काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बक्षिसे दिली जातील. तक्रार अर्ज चौैकशीच्या नावाखाली प्रलंबित ठेवणाऱ्या

बक्षीस आणि दंडात्मक कारवाईही...
औरंगाबाद : पोलिसांचे कर्तव्य उत्कृष्टपणे काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बक्षिसे दिली जातील. तक्रार अर्ज चौैकशीच्या नावाखाली प्रलंबित ठेवणाऱ्या, कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. गंभीर प्रकरणात निलंबन, मुख्यालयात बदलीसारखी कारवाई केली जाऊ शकते.
वेरूळ- अजिंठा लेणी येथे लवकरच टूरिस्ट पोलीस
जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठा लेण्या पाहण्याकरिता देश-विदेशातील पर्यटक येतात. त्यांच्या सुरक्षेकरिता, शिवाय त्यांच्याशी इंग्रजीसह विविध भाषांत संवाद साधू शकतील अशा टुरिस्ट पोलिसांची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे. या टुरिस्ट पोलिसांना महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. परिणामी पर्यटकांना कोणताही त्रास येथे होणार नाही, याबाबत हे पोलीस खबरदारी घेतील.
वाळू तस्करांवरील कारवाईकरिता महसूल विभागाला मदत
वाळू तस्करी करणाऱ्या लोकांवर कडक करण्यासाठी तहसीलदार, मंडळ अधिकारी अथवा तलाठी यांना जेव्हा-केव्हा पोलिसांची मदत हवी असेल तेव्हा ती देण्यात येईल. शिवाय क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक करणारे, चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस नियमाप्रमाणे कारवाई करतील.
कन्नड ग्रामीण आणि फर्दापूर पोलीस ठाणे सुरू करणार
औरंगाबाद जिल्ह्यात शेंद्रा एमआयडीसी, वैजापूर ग्रामीण, लासूर आणि करंजखेडा, कन्नड ग्रामीण आणि फर्दापूर या सहा नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यापैकी कन्नड ग्रामीण आणि फर्दापूरचे प्रस्ताव मंजूर झाले असून ही ठाणी लवकरच सुरू केली जाणार आहेत. पोलीस ठाण्याच्या इमारत, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे बांधकाम सुरू करण्यात येत असल्याचे अधीक्षक रेड्डी यांनी सांगितले.
क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सौहार्दपूर्ण वातावरण करणार
ग्रामीण पोलीस दलातून लवकरच कम्युनिटी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असून यात प्रत्येक गावातील सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होऊ शकतात. त्यामुळे विविध जाती-धर्मातील दरी कमी होऊन सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.
महिलांवरील गुन्हे रोखण्याकरिता स्वतंत्र पथक
शाळा, महाविद्यालयात मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्याकरिता स्वतंत्र पथक स्थापन करण्यात येत आहे. हे पथक प्रत्येक शाळा, महाविद्यालयात जाऊन मुले, मुलींशी संवाद साधेल आणि कायदेविषयक माहिती देईल. पथकाचे मोबाईल क्रमांक असणारी पत्रके वाटप केली जाणार आहेत.
औरंगाबाद ग्रामीण विभागात दोषसिद्धीचे प्रमाण १८ टक्के आहे. हे प्रमाण वाढविण्याकरिता विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्येक दाखल गुन्ह्यात आता सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून घेण्याचे आदेशित केले आहे. शिवाय दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचे अवलोकन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.