पैठणच्या शेतकऱ्यांचे क्रांतीचौकात आंदोलन
By Admin | Updated: March 31, 2015 00:40 IST2015-03-31T00:19:46+5:302015-03-31T00:40:35+5:30
औरंगाबाद : ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी औरंगाबादेतील क्रांतीचौकात धरणे आंदोलन केले.

पैठणच्या शेतकऱ्यांचे क्रांतीचौकात आंदोलन
औरंगाबाद : ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी औरंगाबादेतील क्रांतीचौकात धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी ही योजना पूर्ण करण्यासाठी सरकारला सुबुद्धी द्या, असे साकडे शिवरायांना घातले.
पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाखालील गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यास फायदेशीर ठरणारी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून होत आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात ७० कोटींची तरतूद करावी, या मागणीसाठी समितीच्या वतीने आयुक्तालयावर मोर्चाही काढण्यात आला; परंतु तरीही अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद न झाल्यामुळे समितीच्या वतीने आज क्रांतीचौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात पैठण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दिवसभर बसून या शेतकऱ्यांनी सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे घातले.
यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. या आंदोलनात जायकवाडी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी, बद्रीनाथ गोर्डे, दादासाहेब भत्तलेकर, हरिभाऊ कासुबे, सोपान भालेकर, शिरीष रोडे, परसराम बनकर, ज्ञानदेव काळे, प्रकाश गळधर, सोमनाथ दिलवाले, मच्छिंद्र दिलवाले, जनार्दन जमादार, रामनाथ दिलवाले, संतराम कुमावत, सखाराम दिलवाले, गोरख संत आदी सहभागी झाले.