मराठ्यांच्या एकजुटीची ‘क्रांती’

By Admin | Updated: August 10, 2016 00:29 IST2016-08-10T00:22:01+5:302016-08-10T00:29:49+5:30

औरंगाबाद : कोपर्डी हत्याकांड निषेधाच्या निमित्ताने मराठा समाजाने मंगळवारी (दि. ९) क्रांतीदिनी औरंगाबादेत एतिहासिक असा अतिविराट मोर्चा काढीत समाजाच्या एकजुटीची ‘क्रांती’ घडवून आणली

'Revolution' of Maratha unity | मराठ्यांच्या एकजुटीची ‘क्रांती’

मराठ्यांच्या एकजुटीची ‘क्रांती’



औरंगाबाद : कोपर्डी हत्याकांड निषेधाच्या निमित्ताने मराठा समाजाने मंगळवारी (दि. ९) क्रांतीदिनी औरंगाबादेत एतिहासिक असा अतिविराट मोर्चा काढीत समाजाच्या एकजुटीची ‘क्रांती’ घडवून आणली. ‘आमच्या पोरीची अब्रू इतकी स्वस्त कशी कोपर्डीच्या नराधमांना तात्काळ फाशी’ अशा संतप्त भावना व्यक्त करीत सुमारे पावणेदोन लाख मराठा बांधवांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरत मनामनातील संताप या मोर्चातून व्यक्त केला. मोर्चाच्या निमित्ताने मराठा समाजाची झालेली एकजूट, महिला- तरुणींची उपस्थिती आणि शिस्तपणा लक्षणीयच ठरला...
क्रांतीचौकातून सकाळी ११ वाजता मूक मोर्चाला सुरुवात झाली. तेथून पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, सराफा रोड, शहागंजमार्गे मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. विशेष म्हणजे या मोर्चात समाजातील विविध क्षेत्रातील, विविध वयोगटातील महिला, पुरुष तसेच तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली. महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिलांची संख्या वाखाणण्याजोगी होती. क्रांती चौकातून ६ कि.मी. अंतर पार करून विभागीय आयुक्तालयासमोर मोर्चा पोहोचला तेव्हा शेवटचे टोक क्रांतीचौकात होते. यावरून या मोर्चाची व्याप्ती लक्षात येऊ शकते. उल्लेखनीय म्हणजे मोर्चाला कोणाचे नेतृत्व नव्हते.
दोन किंवा एका रांगेत मोर्चा नव्हता तर रस्ते मोर्चेकरींनी ओसंडून वाहत होते. मोर्चात शिरण्यासाठी जागा नव्हती. ‘न भूतो ना भविष्यती’ असा हा मोर्चा होता, अशी प्रतिक्रिया शहरातील ज्येष्ठांनी व्यक्त केली. मोर्चाला ११ वाजता सुरुवात झाली पण सकाळी ८ वाजेपासूनच मोर्चेकरी क्रांतीचौकात जमा होऊ लागले होते. बाहेरगावाहून लोकांचे जथे शहरात येत होते. सिडको बसस्थानकात उतरलेले मराठा बांधव जालना रोडने पायीच मोर्चात सहभागी होण्यासाठी चालले होते.
चोहोबाजूने क्रांतीचौकात मोर्चेकरी येत होते. उड्डाणपुलाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या साक्षीने मोर्चाला सुरुवात झाली. कोपर्डी हत्याकांडाच्या निषेधार्थ महिलांनी काळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. तर पुरुषांनी काळ्या रंगाचे पोशाख, काहींनी काळ्या रंगाचे शर्ट, टी शर्ट घातले होते. कोणी डोक्याला तर कोणी दंडाला काळी फीत बांधली होती. शेकडो युवक-युवतींच्या हातात फलक होते. त्यावर ‘फास्ट-ट्रॅक कोर्टाचा उपयोग करा... त्या नराधमांना फाशी द्या’, ‘अन्यायाविरुद्ध करूया बंड कोपर्डीच्या गुन्हेगारांना मृत्युदंड’, ‘कोपर्डीच्या आरोपींची शिक्षा काय तोडून टाका हात पाय’ अशा घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. कोणी भगवे झेंडे तर कोणी काळे झेंडे हातात घेतले होते. मूक मोर्चा असल्याने कोणी घोषणा देत नव्हते; पण प्रत्येकाच्या मनात कोपर्डी हत्याकांडाबद्दल प्रचंड चीड दिसून आली. नूतन कॉलनीमार्गे पैठणगेट येथे मोर्चा पोहोचला. क्रांती मोर्चाचे विराट रूप सर्वांना दिसले. टिळकपथ, गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, सराफा रोड, शहागंज, चेलीपुरामार्गे मोर्चा आयुक्तालयासमोरील चौकात पोहोचला. तेव्हा (पान २ वर)
मराठा क्रांती मोर्चा जेव्हा विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील चौकात पोहोचला तेव्हा तेथे व्यासपीठावर दोन तरुणी उभ्या होत्या. मोर्चेकऱ्यांतर्फे विभागीय आयुक्तांना देण्यात येणाऱ्या निवेदनाचे त्या तरुणींनी जाहीर वाचन केले. ९ आॅगस्ट १९४२ च्या पूर्वसंध्येला महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा दिला होता.
मराठा समाजाने आजच्या या विराट मूक मोर्चातून ‘महिलांवरील अत्याचाराला’ चले जाव म्हटले आहे. आजच्या या मोर्चाने महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला ‘मी एकटी नाही’ माझ्या पाठीशी समाज भक्कमपणे उभा आहे, असा संदेश दिलेला आहे, असे अश्विनी भालेकर यांनी निवेदनातून सांगितले.
या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे ठीक अकरा वाजेच्या सुमारास हा मोर्चा सुरू झाला. साडेबारा वाजेपर्यंत मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ पोहोचला. ज्यावेळी मोर्चातील पहिला मोर्चेकरी विभागीय आयुक्तालयाजवळ पोहोचला होता, त्यावेळी या मोर्चाचे शेवटचे टोक क्रांतीचौकात होते. विशेष म्हणजे क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयाचा हा रस्ता मोर्चेकऱ्यांनी झाकून गेला होता. यावेळी सर्वत्र केवळ मोर्चेकरीच दिसत होते.
औरंगाबादचा ऐतिहासिक मोर्चा
मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेला हा मोर्चा औरंगाबादसाठी ऐतिहासिकच ठरला. कोणत्याही पक्ष- संघटनेने काढलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा असल्याचा दावा आयोजकांनी तर केलाच केला, पोलीस प्रशासनानेही त्याला दुजोरा दिला. आयोजकांनी दोन लाखांच्यावर मोर्चेकरी सहभागी झाल्याचा दावा केला, तर पोलिसांच्या मते सव्वा ते पावणेदोन लाख मोर्चेकरी सहभागी झाले असावेत.
महिला, तरुणांची लक्षणीय उपस्थिती
या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे आंदोलनासारख्या सार्वजनिक कार्यक्रमात सहसा सहभागी न होणाऱ्या मराठा समाजाच्या महिला आणि तरुणींची संख्या लक्षणीय होती. सुमारे २५ हजार महिला आणि तरुणींनी या मोर्चात सहभाग नोंदविल्याचा अंदाज आहे.
४वकिलांची कोट घालून उपस्थिती.
४५ हजार उद्योजक, बिल्डर, दुकानदारांचा सहभाग.
४कोणतीही हुल्लडबाजी अथवा घोषणाबाजी नाही.
४एकही नेता व्यासपीठावर नाही, आजी-माजी आमदार बसले जमिनीवर.
४कोणाचीही भाषणे नाहीत.
४मुलीच्या हातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार.
४मोर्चाच्या निवेदनाचे
मुलीकडून जाहीर वाचन.
४समारोपप्रसंगी मोजकेच निवेदन आणि शांततेचे सतत आवाहन.
४समारोपानंतर परत जाताना
महिला आणि मुलींना प्राधान्य.
४ शिक्षण संस्थाचालक,
प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग
४मराठा समाजातील
पदाधिकाऱ्यांची प्रचंड मेहनत

Web Title: 'Revolution' of Maratha unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.